‘शी टेल्स’मधून महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रेरणादायी कथा
हर वर्ड इंडिया व अर्हम फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम : विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी मांडले अनुभव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय प्रवासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हर वर्ड इंडिया आणि अर्हम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शी टेल्स : महिलांच्या सक्षमीकरणाच्या कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांनी आपल्या अनुभवांचे, संघर्षाचे, जिद्दीचे आणि नेतृत्वाचे प्रेरणादायी पैलू उलगडले.
महिलांना आपले अनुभव मांडण्यासाठी, अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रत्येक महिलेचा प्रवास हा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, या भावनेतून महिलांच्या धैर्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शर्मिला बापट, माजी संचालक, ब्रीक-एनसीसीएस, उपस्थित होत्या. तर सन्माननीय अतिथी म्हणून पवनीत कौर, आयएएस व अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, तसेच डॉ. पारुल गंजू, सह-संस्थापक, अहम्युन बायोसायन्सेस, उपस्थित होत्या.
कार्यक्रमात कलाकार तेजल गायकवाड, जुबी, उद्योजिका व लेखिका जुही गुप्ते, लेखिका आशा गौर, रेश्मा घणेकर, रुचा लिमये आणि हर वर्ड इंडियाच्या अध्यक्षा राखी बक्षी यांनी आपापल्या आयुष्यातील अनुभव आणि प्रेरणादायी कथा उपस्थितांसमोर मांडल्या.
डॉ. शर्मिला बापट यांनी वैज्ञानिक क्षेत्रात काम करताना आलेले संघर्ष आणि आव्हाने याविषयी अनुभव सांगितले. पवनीत कौर यांनी विकासप्रक्रियेत महिलांची भूमिका अधोरेखित केली. तर डॉ. पारुल गंजू यांनी महिलांना समान संधी उपलब्ध करून देणारी परिसंस्था निर्माण करण्याचे महत्त्व विशद केले.
या वेळी अर्हम फाउंडेशनच्या संचालिका राजश्री पगारिया, उपाध्यक्षा प्रीती पगारिया, प्राचार्य डॉ. अमन मिश्रा, प्राचार्या प्रभा बटवाल, डॉ. प्रज्ञा देशपांडे आणि बरखा जयसिंघानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा पांडे यांनी केले, तर अर्हम फाउंडेशनच्या उपाध्यक्षा प्रीती पगारिया यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील तरुण विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
