आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘ती’ ऑडिओ क्लिप, रील्स तथ्यहीन आणि निराधार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 3, 2026
Spread the love

पुणे : पुणे शहरात गेल्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी रील आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना, पुणे पोलिसांनी या दाव्याचे खंडन केले आहे. पोलिसांच्या पडताळणीत असा दावा सिद्ध करणारी कोणतीही ठोस माहिती, अधिकृत नोंद किंवा पुरावा आढळून आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लाईक मिळविण्यासाठी एका मुलीने हा सर्व खटाटोप केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल ऑडिओ रेकॉर्ड करणार्‍या व्यक्तीशी संपर्क साधून चौकशी करण्यात आली. तसेच संबंधित सोसायटीचे पदाधिकारी, व्यवस्थापन, शेजारी आणि इतर संबंधित व्यक्तींकडूनही माहिती घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करण्यात आली.

या चौकशीत पुणे शहरात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचे सिद्ध करणारी कोणतीही अधिकृत नोंद किंवा विश्वसनीय माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली संबंधित रील आणि ऑडिओ क्लिप तथ्यहीन आणि निराधार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.

मात्र, या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरूच असून, पुढील तपासात कोणतीही नवीन माहिती किंवा पुरावा मिळाल्यास त्यानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

अप्रमाणित आणि दिशाभूल करणार्‍या माहितीमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती खातरजमा न करता सोशल मीडियावर पुढे पाठवू नये, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

महिला आणि मुलींची सुरक्षितता ही पुणे पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असून, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने केल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी माहितीची खातरजमा करण्यासाठी पुणे पोलिसांच्या अधिकृत आणि सत्यापित माध्यमांवरच विश्वास ठेवावा. कोणतीही वास्तविक घटना, संशयास्पद बाब किंवा संबंधित माहिती आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.