सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणूक करवून फसविणारा गजाआड
कंपनी स्थापन करून १ कोटी ८५ लाखांची फसवणूक : नऱ्हे पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रोजेक्ट आणण्यासाठी ओळखी असल्याचे सांगून सॉफ्टवेअर कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यावसायिकाची १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नऱ्हे पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत तुषार तेजराम घडाळे (वय ४६, रा. सेलेस्टियल सिटी, रावेत) यांनी नऱ्हे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रविण दत्तू शेळके (वय ४०, रा. गणेश व्हिला सोसायटी, धायरी) यांना अटक केली आहे.
निता प्रविण शेळके आणि रिचर्ड पात्रिदगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नऱ्हे येथील नवले आयकॉनमधील इंपिरिकल बिझनेस सेंटरमधील प्रिस्टन इन्फो ग्लोबल सोल्युशन प्रा. लि. येथे २५ मे २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शेळके आणि निता शेळके यांनी आपसात संगनमत करून इटर्निटीक्यु क्लायंट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीचे मालक संज्योत संदिप काटे यांची बिझनेस कन्सल्टंट रिचर्ड पात्रिदगे याने कंपनीकरिता प्रकल्प मिळवून देण्यासाठी रिसेपशन २४/७ कंपनीचे बनावट अॅग्रीमेंट व कागदपत्रे पाठवून २ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
हे माहिती असताना फिर्यादी व त्यांचा मित्र विवेक भारती यांना प्रविण शेळके व निता शेळके यांनी इटर्निटीक्यु क्लायंट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीसोबत बिझनेस कन्सल्टंट रिचर्ड याने ई-मेलद्वारे केलेला पत्रव्यवहार व करारनामे प्राप्त करून ही कंपनी स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवले.
या कंपनीमध्ये निता शेळके आणि संज्योत काटे या दोघी संचालक असल्याचे सांगितले. प्रिन्सन इन्फो ग्लोबल सोल्युशन प्रा. लि. ही आयटी कंपनी स्थापन करण्यासाठी विश्वास संपादन केला.
बिझनेस कन्सल्टंट रिचर्ड हा कोणताही प्रकल्प देणार नसल्याचे माहिती असतानाही या बनावट कागदपत्रे व करारनाम्यांचा वापर करून भागीदारीमध्ये कंपनी स्थापन केली. या कंपनीत १ कोटी ८५ लाख ६० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले.
तसेच कंपनीमध्ये रिचर्ड याला कृष्णा जी या नावाने ट्रेनर म्हणून नेमून तुषार तेजराम घडाळे व त्यांचा मित्र विवेक भारती यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नऱ्हे पोलिसांनी प्रविण शेळके यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.
