आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डोक्यात दगड घालून मित्राचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 5, 2026
Spread the love

पुणे : एकमेकांचे मित्र असलेल्या दोघांनी दारू पिल्यानंतर चायनीज गाडीवर केलेल्या जेवणाचे पैसे देण्यावरून वाद झाला. या वादात एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.

राजकुमार अंबाजी सनगुंडे (वय २५, रा. आंबेडकरनगर, आर. के. कॉलनी, कात्रज-कोंढवा रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. येवलेवाडी पोलिसांनी तुषार राजू वाल्हेकर (वय २९, रा. स्वामी समर्थनगर, गोकुळनगर) याला अटक केली आहे.

याबाबत राजकुमार यांची बहीण सुदेवी आमरेश कांबळे (वय २९, रा. आंबेडकरनगर, कात्रज-कोंढवा रोड) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील एअरकिंग वाईन्स दुकानासमोरील मोकळ्या जागेत रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार सनगुंडे आणि तुषार वाल्हेकर हे एकमेकांच्या ओळखीचे असून ते चालक म्हणून काम करतात. ते नेहमी सोबत असायचे.

रविवारी दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांनी तेथील चायनीज गाडीवर जेवण केले. जेवणाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला.

त्यावेळी तेथेच पडलेला दगड तुषार वाल्हेकर याने राजकुमार सनगुंडे यांच्या डोक्यात घातला. त्यात गंभीर जखमी होऊन राजकुमार सनगुंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, सहायक पोलीस निरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक विजय महाडिक यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचले. पोलिसांनी तुषार वाल्हेकर याला अटक केली असून, पोलीस निरीक्षक दीपक करांडे तपास करीत आहेत.