आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाकडून गावठी कट्ट्यासह काडतूस जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 4, 2026
Spread the love

पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका २३ वर्षांच्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात करण्यात आली.

कुणाल भागवत शेटे (वय २३, सध्या रा. पंचम प्राईड, सिंहगड लॉ कॉलेजजवळ, आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि त्यांचे पथक परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार संग्राम पवार आणि अभिनय चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील ‘द बाईक गॅलेक्सी’ दुकानासमोर एक तरुण अग्निशस्त्र घेऊन थांबल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथे थांबलेल्या कुणाल शेटे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल शेटे हा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत आहे. कुणाल शेटे याने हा गावठी कट्टा उज्जैन येथून आणला होता. स्वतःच्या संरक्षणासाठी त्याने तो आणला होता.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक रंगराव पवार, संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे तसेच पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, संग्राम पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे आणि मंगेश गायकवाड यांच्या पथकाने केली.