डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात वार करून खुनाचा प्रयत्न
उत्तमनगरमधील घटना : दारूच्या नशेतून झाला होता वाद, एकाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत असताना एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी डिलिव्हरी बॉय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
आदित्य गुलाब कांबळे (वय २३, रा. कोंढवे धावडे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर प्रदीप कोठारी (वय २२, रा. इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) याला अटक केली आहे.
त्याच्याबरोबरील अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तमनगर येथील भवानी माता मंदिराजवळ रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य कांबळे हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. ते व त्यांचे मित्र उत्तमनगर येथील भवानी माता मंदिराजवळील चौकात थांबले होते.
यावेळी सागर कोठारी व त्याचा अल्पवयीन साथीदार दारूच्या नशेत तेथे आले. फिर्यादी यांनी त्याच्याकडे पाहिल्यावरून त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा सागर कोठारी याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्याच्याकडील कोयत्याने आदित्य कांबळे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
उत्तमनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी सागर कोठारी याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून सागर कोठारी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करीत आहेत.
