आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मालाने भरलेल्या ट्रकचे फोटो दाखवून व्यापार्‍यास ५० लाखांचा गंडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 5, 2026
Spread the love

पुणे : सेंट्रिंग मटेरियल स्क्रॅपच्या मालाने भरलेल्या ट्रकचे फोटो व पावत्या दाखवून व्यापार्‍याकडून ५० लाख रुपये घेऊन माल न पुरवता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दिनेश जयंतीलाल शहा (वय ६२, रा. अंकुर पार्क सोसायटी, महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शरद कैलास ढोकले (वय ४१, रा. गुलमोहर पॅराडाईज, नगर रोड, विमाननगर) आणि निलेश दत्तात्रय खुटवड (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, सध्या रा. शुभम अपार्टमेंट, पारसी आगरी मंदिराजवळ, रास्ता पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ मे ते २३ मे २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश शहा यांचा ‘शहा एंटरप्रायजेस’ नावाने स्क्रॅप मटेरियल खरेदी-विक्रीचा गेल्या एक वर्षापासून व्यवसाय आहे.

‘सायनिका इम्पोर्ट एक्सपोर्ट’चे मालक शरद ढोकले व निलेश खुटवड हे स्क्रॅपचा व्यवसाय करतात. १९ मे २०२६ रोजी निलेश खुटवड याने शहा यांना फोन करून सांगितले की, चिखली येथे सेंट्रिंग स्क्रॅपचा माल असून ट्रक लोड आहे. तसेच हैदराबाद येथेही स्क्रॅप मटेरियलचे ट्रक लोड आहेत.

त्यानंतर त्यांनी २२ मे रोजी त्यांच्यात झालेल्या व्यवहारासाठी मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर या मटेरियल व्यवहारापोटी मालाचा इन्व्हॉईस, ई-वे बिल, मालाचे फोटो, ट्रकचा फोटो व काटा पावती अशी कागदपत्रे, तसेच हैदराबाद येथेही सेंट्रिंग स्क्रॅप मटेरियल असून तोही ट्रकमध्ये लोड केला असल्याची कागदपत्रे पाठविली. उद्या तुम्ही चिखली येथे माल लोड केलेला ट्रक पाहून या, असे सांगितले.

शहा यांनी ‘सायनिका इम्पोर्ट एक्सपोर्ट’ ही नोंदणीकृत संस्था असून ती शरद ढोकले यांच्या नावावर असल्याचे शासकीय वेबसाईटवर तपासले. चिखली येथे जाऊन मालाने भरलेला ट्रक पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवून व्यवहारापोटी ५० लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांनी मालाची वाट पाहिली. परंतु, त्यांना तो माल काही मिळाला नाही. त्यांनी दोघांना फोन केले. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

चिखली येथील ट्रक आणि हैदराबाद येथील ट्रकमधील माल मिळेल, म्हणून काही दिवस वाट पाहिली. तरीही माल न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद स्वारगेट पोलिसांकडे दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सिसोदे तपास करीत आहेत.