आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यात पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांवर पहाटे कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 5, 2026
Spread the love

पुणे : अंमली पदार्थ बाळगून पहाटेच्या सुमारास मैदानात थांबलेल्या तिघांना कोंढवा पोलिसांनी संशयावरून पकडले. त्यांच्या झडतीमध्ये ५५ हजार रुपयांचे १० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे.

अमन नईम सय्यद (वय २५, रा. बुद्धीवंत विद्या निकेतन सोसायटी, उंड्री), अनिकेत शैलेश भालेराव (वय २३, रा. अहिल्या सोसायटी, गोल्फ क्लब, फुलेनगर, उंड्री) आणि वैभव बाबासाहेब शेट्टी (वय १९, रा. वडाची वाडी, उंड्री) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमन सय्यद हा सेल्समन म्हणून काम करतो, तर अनिकेत भालेराव व वैभव शेट्टी हे शिक्षण घेत आहेत.

कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री मध्यरात्रीनंतर केली जाते. पोलीस तसेच अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने काही दिवसांपूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार २ ऑक्टोबर रोजी पहाटे गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सूरज शुक्ला व ओंकार शेटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एनआयबीएम-उंड्री रोडवरील आनंदवन ६च्या मोकळ्या मैदानात एमडी विक्रीसाठी काही जण आले आहेत.

या बातमीची खातरजमा करून पोलीस पथक तेथे पोहोचले. त्यांनी मैदानात थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. अमन याच्याकडून ६ ग्रॅम, तर अनिकेत भालेराव याच्याकडून ३ ग्रॅम एमडी जप्त केले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी वैभव शेट्टी याच्याकडून हा एमडी घेतल्याचे सांगितले. तिघांकडून १० ग्रॅम एमडी व दुचाकी असा ५५ हजार ४८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार अमोल हिरवे, रवींद्र चिपा, कारखेले, पोलीस अंमलदार शाहिद रजपूत, प्रशांत खाडे, रियाज पटेल, रशिद, रवी जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, सूरज शुक्ला, केशव हिरवे, राहुल रासगे, अमित सूर्यवंशी, शेख, शेलार, ओंकार शेटे यांनी केली आहे.