आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिअल इस्टेट कन्सल्टंटची २० लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 6, 2026
Spread the love

पुणे : वेळोवेळी घेतलेले पैसे परत करून विश्वास संपादन केल्यानंतर, गुंतवणूक केल्यास १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून चतु:शृंगी पोलिसांनी सेकंड हँड गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अक्षय मिलिंद महाजन (वय ३५, रा. अभिलाषा अपार्टमेंट, अभिमानश्री, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी मनोज विनय काणे (वय ४६, रा. ट्विन टॉवर, वेस्टएंड मॉल रोड, वायरलेस कॉलनी, औंध) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२३ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा रिअल इस्टेट कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायात साहिल मुथा हे भागीदार आहेत.

साहिल मुथा यांची मनोज काणे याच्याशी ओळख झाली होती. मनोज काणे हे सेकंड हँड चारचाकी गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.

व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी ते फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी उसने पैसे घेत होते. उसने घेतलेले पैसे वेळेवर परत करून त्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला होता.

मार्च २०२३ मध्ये मनोज काणे याने सांगितले की, सध्या माझ्याकडे सेकंड हँड चारचाकी गाड्या घेण्यासाठी भांडवल उपलब्ध नाही. तुम्ही माझ्या व्यवसायात भांडवल गुंतवणूक केली, तर त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून तुम्हाला चांगला मोबदला मिळवून देऊ शकतो, असे त्याने सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्याला २५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर वेळोवेळी मनोज काणे याला प्रत्यक्ष भेटून फिर्यादी यांनी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या रकमेबाबत आणि मोबदल्याबाबत विचारणा केली.

त्याने नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान ५ लाख रुपये परत केले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना मोबदल्यातील कोणतीही रक्कम दिली नाही.

तसेच, गुंतवणुकीतील उर्वरित रक्कमही परत करत नसल्याने त्यांनी वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर २६ मार्च २०२४ रोजी मनोज काणे याने प्रतिज्ञापत्र करून उर्वरित रकमेवर १८ टक्के व्याजदराने नफ्याच्या स्वरूपात रक्कम देण्याचे पुन्हा आमिष दाखवले.

त्यानंतरही त्याने कोणतीही रक्कम परत केली नसल्याने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद महाजन यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शोभा भांडवलकर तपास करीत आहेत.