पुणे पुस्तक जत्रेत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा विशेष सहभाग
पुस्तकप्रेमींना मोफत पुस्तके : गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा विशेष सहभाग असून, सूर्यदत्तच्या स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक पुस्तकप्रेमीला मोफत पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि पुस्तकांशी अधिकाधिक लोकांचे नाते जोडले जावे, या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुणे पुस्तक जत्रा व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव व मराठी साहित्य मेळा यंदा ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान टिळक रोड येथील न्यू इंडिया स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या आकर्षक स्टॉलवर विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती तसेच वाचनाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
“प्रत्येक पुस्तकप्रेमीने पुस्तक घेऊन जावे” या भावनेतून स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकाला पुस्तक भेट देण्यात येणार आहे. पुस्तक हे केवळ वाचनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, विचारांची समृद्धी आणि ज्ञानवृद्धीचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सूर्यदत्तच्या वतीने करण्यात येणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, पदक आणि त्यांच्या आवडीचे पुस्तक देऊन गौरविण्यात येणार असून, सन्मानासाठी विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका (Marksheet) सोबत आणणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे.
पुणे पुस्तक जत्रेच्या उद्घाटनासाठी खासदार उदयनराजे भोसले, महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, साहित्यिक रविंद्र गुजर, महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या या विशेष सहभागामध्ये मोफत पुस्तक वाटप, वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
पालकांनी, शिक्षकांनी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या पाल्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी या पुस्तक जत्रेला आवर्जून भेट द्यावी आणि त्यांना या ज्ञानोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
“पुस्तक हे ज्ञान, विचार आणि अनुभव समृद्ध करणारे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे आणि वाचनाची सवय पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी. पुस्तक जत्रा आणि साहित्य मेळे हे समाजात वाचनसंस्कृती रुजविणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. म्हणूनच सूर्यदत्तच्या वतीने पुस्तक जत्रेला भेट देणाऱ्या प्रत्येक पुस्तकप्रेमीला पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबवत आहोत. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन या ज्ञानोत्सवाचा लाभ घ्यावा.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
