महिलेला मारहाण करून दागिने हिसकावणारा अटकेत
येवलेवाडी पोलिसांची कामगिरी : कोंढवा स्मशानभूमीजवळील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आल्याची घटना कोंढव्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या चोरट्याला अटक केली.
आसिफ सलीम शेख (वय २६, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ४३ वर्षांच्या महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी परिसरातून निघाल्या होत्या.
त्यावेळी आरोपी शेखने महिलेला अडवले. महिलेला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. शेख तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून पसार झालेल्या आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करत आहेत.
पतीकडून पत्नीच्या मित्राला मारहाण
पत्नीची एका तरुणासोबत मैत्री झाली असून ते भेटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पतीने मित्रांना बोलावून तरुणाला मारहाण केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पतीसह त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वसिम युनूस मुजावर (वय २८, रा. शिंदे वस्ती, हडपसर), वैभव दिलीप अवचिते (वय १९, रा. आझादनगर, वानवडी), सुनील परशुराम अरदाऊर (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका २४ वर्षांच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे भागात राहतो. त्याची एका विवाहित तरुणीशी मैत्री झाली. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुण तिला भेटण्यासाठी कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता चौकात आला. याबाबतची माहिती विवाहित तरुणीच्या पतीला मिळाली. त्यानंतर आरोपीने मित्रांना बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी तरुणाला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
