आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडणारा जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 7, 2026
Spread the love

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील दानपेटी फोडून ६० हजार रुपयांची रोकड चोरून पळून गेलेल्या चोरट्याचा माग काढून फरासखाना पोलिसांनी अवघ्या ८ तासांत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्याचा माग काढला.

संग्राम राजेंद्र जाधव (वय २९, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. श्री कसबा गणपती मंदिराचा मुख्य दरवाजा सोमवारी रात्री बंद करण्यात आला. मध्यरात्री दरवाज्याची कडी उचकटून गाभाऱ्यातील दानपेटी फोडून रोकड चोरून नेण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. फरासखाना पोलिसांना तातडीने तपास करून चोरट्याला पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंदिरातील दानपेटी फोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमीत खुट्टे, प्रशांत पालांडे यांनी श्री कसबा गणपती मंदिर, जिजामाता बाग, गणेश रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात संशयित चोरटा आढळून आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दानपेटी उचकटून रोकड चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, राजेश महाला, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, प्रणिल चौगले, हवालदार प्रवीण पासलकर, महेश राठोड, सुमीत खुट्टे, प्रशांत पालांडे, श्रीकांत वाघवले, विशाल शिंदे, विशाल औटी, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर यांनी केली.

आरोपी १५ दिवसांपासून पुण्यात
संग्राम जाधव हा कोल्हापूरचा रहिवासी असून त्याची तिकडे शेती आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. कौटुंबिक कारणावरून त्याची मनस्थिती बिघडलेली आहे. त्यातून तो १५ दिवसांपासून पुण्यात आला आहे. तो पुणे रेल्वे स्थानकावर झोपत होता. त्याच्याकडील पैसे संपल्याने त्याने आदल्या दिवशी सर्वत्र पाहणी केली. त्यानंतर मंदिरातील दानपेटी फोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दानपेटी फोडल्यानंतर त्यातील काही रक्कम बँक खात्यात भरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून १८ हजार रुपये जप्त केले आहेत.