बिलिंग मॅनेजरने घातला दीड कोटींचा गंडा
लेबर कॉन्ट्रॅक्टरांशी केले संगनमत : बनावट कामगार दाखवुन काढली बिले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी येथील प्रकल्पामध्ये प्रत्यक्षात पुरविलेल्या कामगारांपेक्षा अधिक कामगार पुरविल्याचे पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड येथील लेबर कॉन्ट्रॅक्टरांशी संगनमत करून दाखवले. त्यांच्या मोबदल्याची बनावट बिले तयार करून बिलिंग मॅनेजरने कंपनीला तब्बल १ कोटी ४६ लाख ६६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अनुप कुमार सन ऑफ भास्करन लंबियार (वय ५३, रा. पार्क ट्रयुरकोईस, पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी ईस्माईल शेख (वय ३६, रा. ईशा मिरेल सोसायटी, कोंढवा), रिझवान शेख (वय ४५, रा. पश्चिम बंगाल), खुशबश अन्सारी (वय ४७, रा. उदयरपूर, सिसवा, झारखंड) आणि संजीव लाला पंडित (वय ४२, रा. धुनीशी, जि. वैशाली, बिहार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना खराडी येथील मिलेनियम इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. या कंपनीच्या पी ग्रॅन्ट रोड, के ५७ आणि के ६५, गेरा कॉमर्स झोन येथील प्रकल्पांमध्ये २०१८ ते २३ मे २०२६ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट विभागात ईस्माईल शेख हा बिलिंग मॅनेजर म्हणून नोकरीला होता.
सध्या तो कंपनीत काम करत नाही. इतर तिघे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. ईस्माईल शेख याने इतर तिघा लेबर कॉन्ट्रॅक्टरांशी संगनमत केले.
खराडी येथील कंपनीचा सध्या सुरू असलेला के ५७ प्रकल्प आणि पूर्वी पूर्ण झालेला के ६५ प्रकल्प अशा दोन्ही प्रकल्पांच्या साइटवर कंपनीला प्रत्यक्षात पुरविलेल्या कामगारांपेक्षा अधिक कामगार पुरविल्याचे दाखवले.
त्यांच्या मोबदल्याची बिले के ५७ आणि के ६५ प्रकल्पांच्या कॉन्ट्रॅक्ट विभागातील बिलिंग कार्यालयातील संगणकावर बनावट पद्धतीने तयार केली. कंपनीला कामगार पुरवले नसतानाही अधिक कामगार पुरविल्याचे दाखवून तिघांच्या नावाने बिले काढली.
दरम्यान, लेखापरीक्षण अहवालात पुरविण्यात आलेले कामगार आणि बिले यांच्यात तफावत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबत सविस्तर तपासणी करण्यात आली.
तेव्हा ईस्माईल शेख याने कंपनीच्या संगणकावर बनावट बिले तयार केल्याचे दिसून आले. तपासणीत त्याने अशा प्रकारे विश्वासघात करून कंपनीची १ कोटी ४६ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.
