श्वान परत हवेत साडेतीन लाख द्या
खंडणी मागितल्याचा पॉस फॉर लाईफ फाऊंडेशनच्या विश्वस्तांवर आरोप : लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सांभाळण्यासाठी दिलेले श्वान परत मागितले असता, साडेतीन लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करीत खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी पॉस फॉर लाईफ फाऊंडेशनच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिनाक्षी गणेश जगताप (वय ३९, रा. राजेश्वरी निवास, मोझेनगर, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पॉस फॉर लाईफ फाऊंडेशनच्या संस्थापक देवयानी ऊर्फ श्रृती लोणे आणि ट्रस्टी शैला नाईक (रा. म्हातोबाची आळंदी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ जानेवारी २०२६ पासून संस्थेत आणि फिर्यादी यांच्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉस फॉर लाईफ फाऊंडेशन ही संस्था रस्त्यावर किंवा कत्तलखान्याकडे जाणाऱ्या सोडून दिलेल्या गायी, म्हशी, कुत्री, मांजरी, पक्षी आणि इतर प्राण्यांना अन्न व निवारा पुरवण्याचे काम करते.
या संस्थेचे म्हातोबाची आळंदी येथे केंद्र आहे. फिर्यादी यांनी त्यांचे मालकीचे एकूण सात श्वान तात्पुरत्या स्वरूपात सांभाळण्यासाठी ठेवून घेण्याबाबत संस्थेच्या लोकांशी संपर्क साधला होता.
त्यावेळी संस्थेतील लोकांनी त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्यांनी आपले सात श्वान संस्थेतील लोकांकडे सांभाळण्यासाठी दिले होते.
फिर्यादी यांनी त्यांचे श्वान परत मागितले असता, आरोपींनी हे श्वान अप्रामाणिकपणे व बेकायदेशीररीत्या स्वतःच्या वापरासाठी स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वापरल्याचा आणि त्यांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादी श्वान परत मागण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांच्याकडे ३ लाख ५० हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच, फिर्यादी यांना ब्लॅकमेल करून शिवीगाळ व धमकी देत मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.
