आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘दादावाला करंडक’ मध्ये लोककलेचा रंगारंग आविष्कार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 9, 2026
Spread the love

पुणे : ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या वतीने आणि ए.एस.डी.बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयोजनाखाली ‘दादावाला करंडक’ आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

‘दादावाला करंडक’ स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष होते. ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या १०० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव साजरा होत असताना यंदाच्या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या स्पर्धेत १८ शाळा आणि १४ कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्ये, प्रांत, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणारी लोकनृत्ये सादर करून सभागृहात उत्साह व रंगत निर्माण केली.

विविध वेशभूषा, पारंपरिक संगीत आणि नृत्याविष्कारातून भारतीय संस्कृतीचे मनोहारी दर्शन उपस्थितांना घडले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुजा सेलोट, उपप्राचार्या उन्नती पाढ तसेच पर्यवेक्षक मिलिंद गुंजाळ उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शाह यांनी भारतीय लोककला आणि सांस्कृतिक परंपरा ही देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अमूल्य ठेव असल्याचे सांगितले.

या परंपरांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘दादावाला करंडक’ हा भारतीय लोकपरंपरेच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाचे रंगीबेरंगी दर्शन घडविणारा उपक्रम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शालेय स्तरावरील स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कलाकार निधी मेहता आणि राहुल साठे यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या संघांना चषक तसेच रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

तसेच, जयराज ग्रुपतर्फे सर्व सहभागी ३२ शाळांना प्रत्येकी ५,००० रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन क्षमा गद्रे आणि दीप्ती सत्यनारायण यांनी केले.

तर अर्चना काळे आणि अमृत शेजवलकर यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिले. ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या शताब्दी वर्षाच्या गौरवशाली वाटचालीत ‘दादावाला करंडक’ हा भारतीय लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचा उत्सव ठरला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.