५ वर्षे फरार गुन्हेगार आंध्र प्रदेशातून जेरबंद
मोक्का कारवाईनंतर होता फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वारजे परिसरात गुंडगिरी करून दहशत पसरवणाऱ्या आणि भररस्त्यात जबरी चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, टोळीतील एक गुंड गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने या गुंडाला आंध्र प्रदेशातून जेरबंद केले आहे.
राजुराम लिचमणराम ऊर्फ लक्ष्मण गेहलोत (वय २७, मूळ रा. डाऊ, ता. जायल, जि. नागौर, राजस्थान) असे या गुंडाचे नाव आहे. तो आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यातील दचेपल्ली येथील रामदेव बाबा ढाब्यावर काम करत होता.
राजुराम गेहलोत हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. तो पुण्यात राजस्थानी कारागिरांसोबत हार्डवेअरच्या दुकानात काम करत होता. त्याच्यावर यापूर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल होते.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाकडून विविध गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पोलीस अंमलदार अतुल साठे व आशिष राठोड यांना गोपनीय बातमीदाराकडून राजुराम गेहलोत हा आंध्र प्रदेशात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आशिष राठोड, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांचे पथक आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यातील दचेपल्ली येथे रवाना झाले.
तेथील नार्केटपल्ली-अडक्की महामार्गावरील बाबा रामदेव ढाब्यावर राजुराम गेहलोत काम करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी त्याला तेथूनच अटक केली. त्याला पुण्यात आणून कोथरूडच्या सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या हवाली केले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आशिष राठोड, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांनी केली.
काय आहे प्रकरण?
याप्रकरणी विकास विष्णू जानावळे (वय २६, रा. वसुंधरा वनविकास सोसायटी, गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून गौरव पासलकर, मंगेश जडीतकर, पल्ल्या चौधरी, राजू गेहलोत व इतरांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना १३ मार्च २०२१ रोजी रात्री ११ वाजता वारजे येथील यश मित्र मंडळ चौकात घडली होती.
विकास जानावळे हे इंटेरियर डेकोरेटर आहेत. कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला होता. त्यावेळी ते एका चहाच्या टपरीवर काम करत होते. घटनेच्या दिवशी ते तेथील व्यवसायाचे ३,३०० रुपये घेऊन आईसोबत रिक्षाने जात होते. त्यांचे वडील मोटारसायकलवरून मागून येत होते.
यश मित्र मंडळ चौकात दुचाकीवरून आलेल्या गौरव पासलकर, मंगेश जडीतकर, पल्ल्या चौधरी आणि राजू गेहलोत यांनी रिक्षा अडवून विकास यांना बाहेर ओढले. त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ३,३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्या आईच्या तोंडावर दगड मारला. मागून आलेल्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली.
त्यांच्या आरडाओरडामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक मदतीसाठी धावले. त्यावेळी या गुंडांनी त्यांच्याकडील कोयते फिरवत, “तुम्ही मध्ये पडलात, तर तुमचे तुकडे तुकडे करून टाकू,” अशी धमकी दिली. त्यानंतर हे गुंड पळून गेले.
याप्रकरणातील पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का कारवाई केली होती. मात्र, त्यांच्यातील राजुराम गेहलोत फरार झाला होता. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
