आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथतर्फे सुलाखे हायस्कूलमध्ये पीस पोस्टर स्पर्धा संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 27, 2026
Spread the love

बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथच्या वतीने सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शांतता पोस्टर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Peace Poster Competition 2026 अंतर्गत २२ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीतील एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यंदाच्या स्पर्धेची संकल्पना “Harmony in Humanity” अर्थात मानवतेतून सद्भावना अशी होती.

स्पर्धेचे उद्घाटन सुलाखे हायस्कूलचे प्राचार्य श्री. रामकृष्ण इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून शांतता, प्रेम, बंधुभाव, मानवता आणि जागतिक सलोखा यांचे प्रभावी संदेश मांडले.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना या उपक्रमातून व्यासपीठ मिळाले. स्पर्धेतील पोस्टर्सचे परीक्षण २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. परीक्षक म्हणून हरिदास कुंभार आणि रामचंद्र इकारे यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २६ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी बार्शी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील धनवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामकृष्ण इंगळे होते. यावेळी पर्यवेक्षिका उर्मिला जावळे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र इकारे यांनी केले.

शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा राखण्यात पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पोलिसांना समाजाचे शांतिदूत म्हणूनही संबोधले जाते.

त्यामुळे मानवतेतून सद्भावना आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील धनवे यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची ठरली.

विद्यार्थ्यांमध्ये शांतता, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभवी राजेंद्र बागुल, द्वितीय क्रमांक सई सदानंद रणझुंजारे आणि तृतीय क्रमांक स्वराली धनाजी फोपळे यांनी पटकावला.

या तिन्ही विद्यार्थिनींना विशेष बक्षिसे आणि आंतरराष्ट्रीय लायन्स पीस पोस्टर स्पर्धेची प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

यामध्ये यशश्री नामदेव कागदे, परीती महेश वाणी, श्रेया नंदू सोनवणे, स्वरा वल्लभ मुगुटकर, भार्गवी अरुण बडवे, स्वाती रघुनाथ ठाकूर, मानसी गणेश भूमकर, तोशिका धीरज गोडसे, सिद्धी प्रकाश नाकटिळक, गौरवी प्रमोद अंधारे, इशा अमर बुडूख आणि जान्हवी अनिल चोरे यांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ८५ विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव करण्याबरोबरच त्यांना शांतता, मानवता आणि जागतिक सलोख्याचा संदेश आपल्या कलाकृतींतून समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

हा उपक्रम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन PMJF राजेंद्र कसवा (शहा) आणि डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन सुहास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथचे अध्यक्ष लिओ लायन शुभम श्रीश्रीमाळ, सचिव उदयन सावंत, खजिनदार गौरव सुराणा, बोर्ड डायरेक्टर यश मेहता, स्पर्धा अध्यक्ष रिया पुनमिया तसेच फर्स्ट लेडी व क्लब सदस्य सायली श्रीश्रीमाळ यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये शांततेचा संदेश रुजविणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि समाजात प्रेम, मानवता व बंधुभावाची भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून शांततेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.