बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी; मंगळसूत्र चोरीप्रकरणी एकाला अटक
२ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत बार्शी शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल असा एकूण २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपीचा शोध सुरू आहे.
दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी विकास लक्ष्मण हिंगमिरे (वय ४६, रा. प्लॉट नं. १, बालाजी व्हिला, जुनी विडी घरकुल, सोलापूर) हे पत्नीसमवेत बार्शीतील कासारवाडी रोड परिसरातून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन ४८ ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत २ लाख १० हजार ३९९ रुपये होती. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना बार्शी शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानुसार महादेव शंकर पवार (वय ३३, रा. महाळुंग, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांचे तुकडे हस्तगत करण्यात आले.
या गुन्ह्यातील अन्य आरोपी विनोद गोविंद पिंपळे याचा शोध बार्शी शहर पोलीस घेत आहेत. त्याच्याकडून उर्वरित सोने हस्तगत करण्याच्या दृष्टीने तसेच आरोपींनी अशाच प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण साठे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना कोतवाल, धनराज फत्तेपूरे, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजिज शेख, राहुल उदार, सचिन नितनाथ, अविनाश पवार, सतीश उघडे, दत्ता सोमवाड, सचिन राऊत, संतोष जाधवर आणि लक्ष्मण शेळके यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सायबर पोलीस ठाण्यातील राहुल सोनकर यांनीही तपासात सहकार्य केले.
सोन्याचे दागिने आणि पल्सर मोटारसायकल जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सोन्याच्या मंगळसूत्राचे चार वेगवेगळ्या आकारांचे तुकडे, वजन २८.६७० ग्रॅम, तसेच ५.६७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, असे एकूण ३४.३४० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या दागिन्यांची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार ५०० रुपये आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किमतीची पल्सर मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
