गुंगीकारक गोळ्या खाण्यास देऊन लुटणारा सराईत चोरटा जेरबंद
स्वारगेट पोलिसांची कामगिरी : उज्जैनमधून केली अटक, ३ गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बस आणि रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना औषध म्हणून गुंगीकारक गोळ्या खाण्यास देऊन, त्यांना गुंगी आल्यानंतर त्यांचे दागिने आणि रोकड लुटून नेणाऱ्या ६३ वर्षीय सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी उज्जैन येथून अटक केली आहे.
बाबू भुरेखान (वय ६३, रा. ऋणिजागाव, ता. सीतामऊ, जि. मंदसौर, मध्य प्रदेश) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यासह नागपूर येथील रामटेक पोलीस ठाण्यातील आणि गुजरातमधील द्वारका येथील प्रत्येकी एका गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.
फिर्यादी यांचे वडील २० ऑगस्ट २०२६ रोजी बोरिवली ते स्वारगेट असा शिवशाही बसने प्रवास करत होते. या ज्येष्ठ नागरिकाला संजय अगरवाल असे बनावट नाव सांगणाऱ्या व्यक्तीने गुंगीच्या गोळ्या सेवन करण्यास दिल्या. त्यानंतर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास केला. त्यातून बाबू भुरेखान याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला उज्जैन येथून अटक केली. त्याच्याकडून ALPRAX 0.5 या गुंगीकारक गोळ्यांची १५ गोळ्या असलेली दोन पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ आणि प्रदीपसिंग सोदे यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल शेळके, पोलीस उपनिरीक्षक बाळू शिरसट, पोलीस अंमलदार प्रदीप शिंदे, किरण रघतवान, नितीन क्षीरसागर, रमेश चव्हाण, अक्षय भोगे, युवराज राठोड, सोमनाथ बटुळे, किरण ढापकर आणि रोहित पोवार यांनी केली.
शिक्षा भोगल्यानंतरही पुन्हा गुन्हेगारी सुरू
बाबू भुरेखान हा सराईत गुन्हेगार आहे. तो ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना बोलण्यात गुंतवत असे. त्यांना असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर आपल्याकडे उपाय असल्याचे तो सांगत असे. ज्येष्ठ नागरिकांनी त्याला, ‘तुम्ही डॉक्टर आहात का?’ असे विचारल्यावर तो त्यांना आपल्याकडील डॉक्टरी ज्ञान सांगून भुलवत असे.
आपल्याकडे त्यांच्या समस्यांवर औषध असल्याचे सांगून तो त्यांना गुंगीच्या चार ते पाच गोळ्या खाण्यास देत असे. त्यामुळे त्यांना गुंगी आल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने आणि रोकड काढून घेत असे. मुक्कामाच्या ठिकाणाच्या आधीच तो बसमधून उतरून जात असे. अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतरही तो पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करू लागल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.
