आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट नोटा बनविणारी टोळी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 27, 2026
Spread the love

पुणे : बनावट नोटा बनवून त्यांची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी मंडई परिसरात पकडले. त्याच्या चौकशीत बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आला असून, पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपयांच्या १,१२८ बनावट नोटा तसेच नोटा बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.

सलमान जैनुद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड), शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा, जि. ठाणे), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखनवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजित रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार सचिन अहिवळे व शैलेश सुर्वे यांना माहिती मिळाली की, एक जण बनावट नोटा घेऊन महात्मा फुले मंडई येथे येणार आहे.

त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेपाच वाजता मंडईच्या पाठीमागील बाजूस असलेल्या म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर सलमान राजे याला पकडले.

त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या ४ लाख २ हजार ५०० रुपये किमतीच्या ८०५ बनावट नोटा आढळून आल्या.

अधिक चौकशी केली असता, सलमान राजे याने त्याचे तीन साथीदार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सातारा आणि कोल्हापूर येथे जाऊन तिघांना अटक केली.

शाफाज अन्सारी याच्या घरातून ५०० रुपये दराच्या १ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीच्या ३२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय, या नोटा बनविण्याचे साहित्य आणि प्रिंटरही जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप व पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे आणि रमेश लाहिगुडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन कदम, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, शैलेश सुर्वे, समीर पवार, शशिकांत दरेकर, जाकीर मणियार, नितीन मुंढे, महेश कदम, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात आणि नितीन बाबर यांनी केली.