चांदणी चौक ते कोथरूड मार्गावर जड वाहनांना
मेट्रोचे काम सुरू : पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक शाखेचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वनाज ते चांदणी चौकदरम्यानच्या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली असून, दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चांदणी चौकाकडून कोथरूडकडे येणाऱ्या जड वाहनांसह एसटी बस आणि खासगी प्रवासी बसवर बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
वनाज मेट्रो स्थानक ते चांदणी चौकदरम्यान विस्तारित मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. वनाज ते चांदणी चौकादरम्यान दुभाजकाजवळ दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिकेड्स बसविण्यात येणार आहेत.
चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. या रस्त्यावर प्रथमेश एलाइट सोसायटीसमोर जड वाहनांना अडथळा निर्माण करण्यासाठी हाइट बॅरिअर बसविण्यात येणार आहे.
चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जड वाहनांचे (डंपर, मिक्सर, मालवाहू वाहने) चालक, तसेच एसटी बस आणि खासगी प्रवासी बसचालकांनी चांदणी चौकातून थेट कोथरूड डेपेकडे न जाता पर्यायी मार्गाचा वापर करावा.
जड वाहने आणि बसचालकांनी चांदणी चौक, डुक्कर खिंड, वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आणि पौड फाटा चौक या मार्गाचा वापर करून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
