श्री पूना गुजराती बंधू समाजाचा इतिहास एकता, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा
अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन : ‘रास गरबा हरिफाई २०२६’ उत्साहात संपन्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘रास गरबा हरिफाई २०२६’ ही स्पर्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी, पुणे येथे उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शाह आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शाह यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे अशोक चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण, वल्लभभाई पटेल, नैनेश नंदू, राजेंद्र शाह, हरेश शाह आणि केतन कापडिया उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना अशोक चव्हाण म्हणाले, “सन १९१३ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या समाजाने गेल्या अनेक दशकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
गुजरातमधून पुण्यात आलेल्या बांधवांनी एकत्र येऊन आपल्या समाजाची स्थापना केली. आपल्या संस्कृतीचे जतन करतानाच पुण्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनात योगदान देण्याची परंपरा या समाजाने जपली आहे.
आज ११३ वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत श्री पूना गुजराती बंधू समाजाने केवळ गुजराती समाजालाच एकत्र आणले नाही, तर पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातही महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.”
या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचा विशेष उल्लेख करावा लागेल. जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर हे गुजराती समाजाच्या एकजुटीची, दूरदृष्टीची आणि समाजासाठी काहीतरी भरीव करण्याच्या इच्छाशक्तीची साक्ष देणारे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे.
हे केंद्र केवळ क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे ठिकाण नाही, तर सर्व समाजांतील लोकांना एकत्र आणणारे, नव्या पिढीला संधी उपलब्ध करून देणारे आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. स्पर्धेत सहभागी मंडळांनी पारंपरिक गरबा नृत्य, आकर्षक वेशभूषा, तालबद्ध संगीत आणि विविध नृत्याविष्कारांच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली.
प्रत्येक मंडळाने आपल्या सादरीकरणातून लोकपरंपरा, सांस्कृतिक वैविध्य आणि सामूहिक उत्साहाचे दर्शन घडविले. संपूर्ण सभागृहात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उपस्थितांना संबोधित करताना श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शाह यांनी पारंपरिक सण, उत्सव आणि सांस्कृतिक स्पर्धा ही समाजाला एकत्र आणण्याची महत्त्वपूर्ण माध्यमे असल्याचे सांगितले.
अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि कलावैभवाची ओळख होते. समाजातील एकोपा दृढ होण्याबरोबरच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.
‘रास गरबा हरिफाई’ ही स्पर्धा पुन्हा सुरू करून सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, भविष्यातही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच, श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील नागरिकांना मदत करण्याच्या सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख १ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली.
या भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाला माननीय अशोक चव्हाण यांनी आपली अमूल्य उपस्थिती लाभवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
तसेच, या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि स्पर्धकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानतो.
जयराज ग्रुपच्या वतीने स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वैष्णवी ग्रुपला चषक आणि २५,००० रुपये, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गहेक्ती गुजरातन ग्रुपला चषक आणि १५,००० रुपये, तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या नवताल ग्रुपला चषक आणि १०,००० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच, जयराज ग्रुपच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा मंडळांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे विशेष पारितोषिक अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, विविध गरबा मंडळांचे प्रतिनिधी, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अनुजा सेलोट आणि निधी मेहता यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका बगदाई यांनी केले.
