आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणारे सायबर चोरटे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 29, 2026
Spread the love

पुणे : मुलींना ड्रग्ज पुरवितो, असे सांगून तरुणाकडून १ लाख ७७ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आणि त्याला आपले जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या दोघा सायबर चोरट्यांना खराडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.

शिखर कुमार गौरव सक्सेना (वय २३) असे जीवन संपविलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाशकुमार संजय सिंग (वय १८, रा. गौरी, ता. कुंठपूर, जि. गोपालगंज, बिहार) आणि राजकुमार संपूर्ण आनंदसिंग (वय २२, रा. बिरण गड, ता. बाराहाट, जि. बांका, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खराडी येथील रिव्हरडेल सूट सोसायटीच्या इमारतीच्या २७व्या मजल्यावरून उडी मारून शिखर सक्सेना याने १ ऑक्टोबर रोजी आपले जीवन संपविले होते.

तो पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या मोबाईलमधील मेसेज आणि फोन-पे व्यवहारांची तपासणी केल्यानंतर त्याला कोणीतरी धमकी देत असल्याचे आढळले.

ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. त्याला धमकावून मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची फिर्याद त्याचे वडील कुमारगौरव सक्सेना यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिली होती.

खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे आणि तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार सूरज जाधव यांनी आरोपींच्या मोबाईल लोकेशनचे व इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले.

त्यात संशयित आरोपी बिहार राज्यातील गोपालगंज आणि दानापूर, पाटणा परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने बिहार येथे जाऊन २० ऑक्टोबर रोजी पाटणा येथे सापळा रचून आकाशकुमार सिंग आणि राजकुमार सिंग यांना पकडले.

आरोपींकडून सात विविध कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक टॅब असे एकूण २ लाख २२ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

आरोपींना अटक करून न्यायालयाकडून पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर त्यांना २३ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे, गणेश घुले, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, मनोज खरपुडे, श्रीकांत शेंडे, नवनाथ वाळके, संतोष लवटे, सूरज जाधव, गणेश गिरी, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी, कमलेश पाटील, अमित छडीदार आणि महेश बोराडे यांनी केली आहे.