मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई : ३० लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्याची मिसिंग म्हणून केली नोंद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड परिसरात रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना दुचाकीवरून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने अडवून ३० लाख रुपये लुटून नेले होते. या दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद मिसिंगचा प्रकार म्हणून केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
विश्वजीत भाऊसाहेब जगताप असे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सॅलिसबरी पार्क येथे एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील साडेचार लाख रुपयांची बॅग चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
स्वारगेट पोलिसांनी जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास केला. त्यात स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मार्केटयार्डमधील एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला लुटून ३० लाख रुपये चोरून नेल्याची कबुली दिली.
७ ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना घडली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात मिसिंगचा प्रकार म्हणून नोंद करण्यात आली होती.
दरोड्यासारखा इतका गंभीर गुन्हा दडपून टाकल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे गंभीर चूक केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन बेशिस्तपणाचे व बेजबाबदारपणाचे असून, त्यामुळे शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना निलंबित केले आहे.
