आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

देणगी देण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची अंगठी केली लंपास

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 28, 2026
Spread the love

पुणे : विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन घरी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला भामट्याने आत्मशुद्धीकरणासाठी मंदिराला देणगी देण्याची बतावणी केली. त्यांच्याकडून सोन्याची अंगठी पिशवीत टाकायला लावून हातचलाखीने अंगठी काढून घेत तो पसार झाला.

याबाबत धनकवडी येथील एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता धनकवडी येथील विठ्ठल मंदिराजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दररोज धनकवडी येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ते मंदिरात जाऊन पाया पडून घरी परत येत होते. वाटेत एका व्यक्तीने त्यांना धक्का मारून, ‘मला ओळखले का?’ असे विचारले. त्यांनी ओळखत नसल्याचे सांगितले.

त्यावर त्या भामट्याने, ‘माझे तुमच्याकडे काम आहे. माझ्या घरी सुतक आहे. मला आत्मिक शुद्धीकरण करायचे आहे आणि मंदिराला पाच हजार रुपये देणगी द्यायची आहे. मला आत्मशुद्धीकरणासाठी तात्पुरती तुमच्या हातातील सोन्याची अंगठी द्या,’ असे सांगितले.

त्यानंतर त्याने पिशवीत पाच हजार रुपये मोजून टाकले आणि, ‘यामध्ये तुम्ही अंगठी टाका. मी तुम्हाला परत देतो,’ असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी अंगठी काढून त्याच्या पिशवीत टाकली. त्याने ती पिशवी फिर्यादी यांच्या हातात देऊन मंदिरात गेल्यावर उघडण्यास सांगितले.

फिर्यादी यांना शंका आल्याने त्यांनी पिशवी तपासली असता त्यात दगड असल्याचे आढळले. तोपर्यंत भामटा आपल्या साथीदारासोबत दुचाकीवरून वेगाने गुलाबनगरच्या दिशेने पसार झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार तडवी करीत आहेत.