पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा मुख्य अभियंत्याला अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : टेंडरबाबत करारनामा करण्यासाठी मागितली लाच
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. प्रत्यक्ष महापालिकेत जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली.
प्रमोद सुधाकर ओंभासे (वय ५७, रा. सेक्टर क्रमांक २/ए, निगडी प्राधिकरण) असे या मुख्य अभियंत्याचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याची एकूण ९१ लाख ५७ हजार रुपयांची पाच टेंडर तक्रारदाराने घेतली होती.
या पाचही कामांची वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेशी करारनामा करणे आवश्यक होते. त्यासाठी करारनामा तयार करून त्यावर कंपनीच्या वतीने सर्वांच्या सह्या घेऊन पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्या सह्या घेण्यासाठी संबंधित प्रकरण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत जमा केले होते.
या करारनाम्यावर सह्या करण्यासाठी अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी टेंडर रकमेच्या ०.५ टक्क्यांप्रमाणे ४५ हजार ७८५ रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती.
त्यावेळी तक्रारदाराने काम झाल्यानंतर बघू, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पाचपैकी तीन टेंडरच्या फाइलवर सह्या करून त्या मुख्य अभियंता ओंभासे यांच्याकडे पाठवून दिल्या होत्या.
तक्रारदाराच्या फाइल बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने २९ मे २०२६ रोजी तक्रारदाराने मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांची भेट घेतली.
प्रमोद ओंभासे यांनी तक्रारदाराच्या पाच टेंडरच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी टेंडर रकमेच्या ०.५ टक्क्यांप्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदाराकडे ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केली.
याबाबत ११ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने ११ जून रोजी पडताळणीची कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये प्रमोद ओंभासे यांनी टेबलवर असलेल्या तीन फाइलमधील ३६ लाख रुपयांच्या टेंडर रकमेच्या ०.५ टक्क्यांप्रमाणे १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच, यापूर्वीही तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नव्हती.
लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला.
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात प्रमोद ओंभासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाऊन गुरुवारी दुपारी ३ वाजता प्रमोद ओंभासे यांना ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ, पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलीस अंमलदार कैलास महामुलकर आणि पोलीस अंमलदार चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली.
तक्रारदार मागे हटला तरी कारवाई – तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर तिची पडताळणी करण्यात आली.
प्रत्यक्ष सापळा कारवाईसाठी तक्रारदाराने लाचेची रक्कम घेऊन येणे आवश्यक असते. मात्र, तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आला नाही.
पोलिसांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीला संशय आल्याची शक्यता निर्माण झाली होती.
काही दिवसांनंतर तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आला आणि माझे काम झाले आहे, असे सांगितले. त्यामुळे सापळा कारवाई होऊ शकली नाही.
तरीही लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ७ नुसार लाच मागणे हाही गुन्हा असल्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून कारवाई केली.
