रक्तदान शिबिरात ७५ जणांचा उत्स्फूर्त सहभाग
स्व. नितीनभाई देसाई यांच्या जयंतीपूर्व दिनानिमित्त आयोजन : रक्तदान हे श्रेष्ठ पुण्यदान – डॉ. राजेश शहा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून ते एक श्रेष्ठ पुण्यदान आहे. समाजातील सामान्य व्यक्तीदेखील रक्तदानात सहभागी होऊन अमूल्य योगदान देऊ शकते. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदानाविषयी जागरूक राहून या सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी केले.
दि पूना गुजराती केळवणी मंडळ, श्री पूना गुजराती बंधू समाज, हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नितीनभाई देसाई यांच्या जयंतीपूर्व दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या शांताबेन सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्व. नितीनभाई देसाई यांच्या कन्या निशा देसाई तसेच गुजरातमधील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, ख्यातनाम लेखक आणि लोकप्रिय स्तंभलेखक डॉ. शरद ठाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच गुजराती साहित्यविश्वातही त्यांनी आपल्या लेखनातून स्वतंत्र आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे.
या रक्तदान शिबिरात पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या राकेश जैन रक्तपेढीने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडत सामाजिक बांधिलकी जपली. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे नैनेश नंदू, जनकभाई शहा, हरेश शहा, दिलीप जगड, पंकज डेडिया, विनोद डेडिया, हेमंत मणियार आणि वल्लभभाई पटेल यांनी विशेष सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, क्रीडा विभागातील खेळाडू, सुपरवायझर द्वारकेश दवे, सेवकवर्ग आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संदीप देशपांडे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून इतरांनाही या सामाजिक कार्यासाठी प्रेरित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा हांडे यांनी केले.
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतानाच मानवसेवेचा आदर्श जपणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
