आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोक्कातील सराईत गुन्हेगार फुरसुंगीतून जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 31, 2026
Spread the love

पुणे : खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून, पिस्तुलाचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आणि मोक्का कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगार तुषार हंबीर याला फुरसुंगी येथून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी, मारामारी आणि आर्म्स ॲक्ट यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही घटना ३ मार्च २०२६ रोजी दुपारी एक वाजता कापूरहोळ ते नारायणपूर रोडदरम्यान घडली होती. याबाबत महेश ऊर्फ लखन काशिनाथ दळवी (वय ४२, रा. कापूरहोळ) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांचे कापूरहोळ येथे आनंद वाईन्स आणि आनंद हॉटेल आहे. त्यांचा मुलगा दुकानातून दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी घराजवळ काळ्या कारमधून आलेल्या ५ ते ६ जणांनी त्याचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेले.

ही माहिती समजताच दळवी यांनी कारचा पाठलाग सुरू केला. त्यांनी पोलिसांनाही तातडीने याबाबत माहिती दिली. त्यांनी शिरवळपर्यंत त्या कारचा पाठलाग केला.

मात्र, पुढे ती कार दिसली नाही. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी येथे त्यांचा मुलगा पृथ्वीराज आणि त्याला घेऊन पळून गेलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्यांना मित्रांकडून समजले.

पृथ्वीराज याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, आरोपींनी त्याला दोघांच्या मध्ये बसवून पळवून नेले. त्याला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी त्याने काय झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर कारमधील दोघांनी, “तुला माहिती नाही का, घरामध्ये काय चालले आहे?” असे विचारले.

त्यावर त्याने आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाच्या बाजूला समोर बसलेल्या व्यक्तीने, “तुम्ही आमच्यावर केसेस करणार, मग आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार आहोत का? आज तुला मारूनच टाकतो,” असे म्हणत हातातील पिस्तुलाची नळी त्याच्या तोंडात घातली. दुसऱ्या व्यक्तीने हातातील कोयता दाखविला. त्यामुळे तो घाबरून गप्प बसला.

थोड्या वेळाने पोलिसांची गाडी आल्याचे दिसताच चालकाने कार शेतातील रस्त्यावर वळवून वेगाने पळवण्यास सुरुवात केली. पोलिसांची गाडीही त्यांचा पाठलाग करू लागली.

त्यावेळी आरोपींनी कार थांबवून पृथ्वीराजला कारमधून रस्त्याच्या कडेला ढकलून दिले आणि कार वेगाने पुढे नेली. मात्र, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरून पलटी झाली.

त्यानंतर कारमधील ५ जण शेतात पळून गेले, असे पृथ्वीराज दळवी याने सांगितले. या घटनेवरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याच्या तपासात तुषार हंबीर आणि त्याच्या टोळीने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या टोळीतील ५ जणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तुषार हंबीर पोलिसांना सापडत नव्हता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तुषार हंबीर हडपसर भागात येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी फुरसुंगी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुषार हंबीर याला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील आणि भारत मोहळ यांनी केली आहे.