महामार्गावर लुटणाऱ्या पोलीस अंमलदाराला अटक
वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई : कंटेनरचालकाकडे मागत होता पैसे, खंडणीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांचा गणवेश परिधान करून बंगळुरू-मुंबई महामार्गावरील डुक्कर खिंडीत भरदिवसा परराज्यातील कंटेनरला अडवून, गाडी जप्त करण्याची धमकी देत लुबाडणाऱ्या पोलीस अंमलदाराला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
बाबुराव पोपट ढोले असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून, त्याची नियुक्ती पोलीस मुख्यालयात आहे. याबाबत शिवकुमार बच्चुलाल सरोज (वय २३, रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) या कंटेनरचालकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास डुक्कर खिंडीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव ढोले याने परराज्यातील कंटेनरला आपली कार आडवी घालून थांबविले.
कंटेनरचालकाकडे सर्व कागदपत्रे असतानाही त्याने त्याच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास, ‘तूने मुझे पैसा नहीं दिया, तो तेरी गाडी जप्त करूंगा और तुझे भी यहाँ से जाने नहीं दूंगा,’ अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली.
बाबुराव ढोले हा कंटेनरचालकाला थांबवून पैशांची मागणी करीत असल्याचे ब्रेकडाऊन झालेल्या गाड्यांची दुरुस्ती करणाऱ्यांना समजले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले.
त्याचवेळी वारजे माळवाडी पोलीस त्या परिसरात होते. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बाबुराव ढोले याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
शिवकुमार सरोज यांच्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करीत आहेत.
एकदा पकडल्यानंतरही पुन्हा तेच उद्योग – बाबुराव ढोले हा महामार्गावर वाहने थांबवून त्यांच्याकडील कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली लाच मागत असल्याची माहिती पोलिसांना होती.
अशाच एका प्रकरणात त्याला यापूर्वी पकडण्यात आले होते. त्यावरून त्याला गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर चार ते पाच महिन्यांपूर्वी त्याचे निलंबन मागे घेऊन पोलीस मुख्यालयात त्याची नियुक्ती करण्यात आली होती.
एकदा कारवाई झाल्यानंतरही त्याने हा प्रकार बंद केला नाही. बाबुराव ढोले हा त्याच्या वॅगनआर कारमधून महामार्गावर येत असे.
मालवाहू वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याची माहिती या महामार्गावर वाहन दुरुस्तीचे काम करणाऱ्यांना मिळाली होती.
बाबुराव ढोले हा पोलीस गणवेशात गुरुवारी सकाळी डुक्कर खिंडीत कारने आला. त्याने कंटेनरला अडवून पैशांची मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
