आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सारसबागेजवळ कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 30, 2026
Spread the love

पुणे : सारसबाग येथील दादावाडी जैन मंदिराबाहेर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारमध्ये शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. शुभरत बाळासाहेब बनसोडे (वय २५, रा. कवडी गाव, लोणी काळभोर) असे त्याचे नाव आहे. गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता होता. हडपसर पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू कसा झाला, हे शवविच्छेदनातून समजणार आहे.

याबाबत त्याचा भाऊ शुभम बाळासाहेब बनसोडे (वय २८, रा. कवडी गाव, मांजरी फार्म, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील रिक्षाचालक आहेत. शुभरत बनसोडे हा २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन घरातून निघाला.

हडपसर गाडीतळावरील रिक्षा थांब्याजवळ त्याने वडिलांना डबा दिला आणि घरी परत जात आहे, असे सांगून तो निघून गेला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याने सौरभ कडू या त्याच्या मित्राला फोन करून हडपसर गावामध्ये भेटण्यासाठी बोलावले.

सौरभ कडू तेथे गेला असता, ‘मी चाललो,’ असे त्याने सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याचा फोन बंद झाला. फिर्यादी शुभम बनसोडे हे नाईट शिफ्ट करून घरी गेले. तेव्हा आईने त्यांना शुभरत अजून घरी आला नसल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दिवसभर सर्व नातेवाईक आणि परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्यानंतर त्यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दादावाडी जैन मंदिराजवळील एका व्यक्तीने तेथे पार्क केलेल्या मारुती कारमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर स्वारगेट पोलीस घटनास्थळी गेले.

ही कार काही दिवसांपासून तेथे उभी असल्याचे दिसून आले. मागील सीटवर एक व्यक्ती बसलेली दिसत होती. पोलिसांनी दरवाजा उघडताच त्याचा मृतदेह दरवाजातून खाली आला.

या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मारुती कारबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, ती कार अविनाश परशुराम गायकवाड याची असल्याचे समजले.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, शुभरत बनसोडे हा त्याची गाडी घेऊन गेला होता, असे त्याने सांगितले. हडपसरमधून तो ही गाडी घेऊन कुठे गेला होता, त्यानंतर सारसबागेसमोर त्याने ही गाडी कधी पार्क केली आणि त्याच्यासोबत कोण कोण होते, याचा तपास केला जात आहे.

शुभरत बनसोडे याचा मृतदेह ससून शवागृहात नेण्यात आला आहे. तेथे त्याचा पंचनामा करण्यात आला. त्याच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत.

शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकेल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करीत आहेत.