न्यायालयात गोंधळ घालणाऱ्यांना ठोठावला दंड
शिवाजीनगर न्यायालयातील घटना : पोलिसांना धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा आणणार्या ९ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर न्यायालयात कामकाज सुरू असताना फिर्यादी, आरोपी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात न्यायालयाच्या कक्षात आणि बाहेर जोरदार हाणामारी झाली. बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचवेळी न्यायालयाने प्रत्येकाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांना धक्काबुक्की करणे आणि बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नामदेव उमाजी पवार (वय ५९), प्रशांत नामदेव पवार (वय ३२), शांता नामदेव पवार (वय ५२), सोपान विठ्ठल चव्हाण (वय ३३, सर्व रा. मोरे वस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड), अमित विलास पवार (वय ३२), आशा गोरखनाथ चव्हाण (वय ३१, रा. लोणी काळभोर), सविता लहू चव्हाण (वय ३८), लहू नारायण चव्हाण (वय ४४), प्रांजल लहू चव्हाण (वय २३, रा. रामनगर तांडा, माजलगाव, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत रिजवाना फिरोज गाजेखान (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पवार व त्याच्या आई-वडिलांविरुद्ध फसवणूक व अब्रुनुकसानीप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याची सुनावणी शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी शिवाजीनगर न्यायालयात सुरू होती. या प्रकरणात न्यायालयाकडून आदेश देण्याची प्रक्रिया सुरू होती.
यावेळी आरोपी, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्याचवेळी आरोपींनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. आरोपींना न्यायालयीन कक्षातून बाहेर काढत असताना त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक फटांगरे तपास करीत आहेत. या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेत आरोपींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिना कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
