ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून तीन लाखांच्या बांगड्या लंपास
दिवाळी सणानिमित्त पैसे वाटपाची बतावणी : रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौकातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दिवाळीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेकडील ३ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौक परिसरात घडली. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेतील नेहरू चौक परिसरात राहायला आहेत.
शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्या गोविंद हलवाई चौक परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. या भागात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. दिवाळीनिमित्त गरजू ज्येष्ठ महिलांना पैसे वाटप करण्यात येत आहे. मी तुम्हाला पैसे देतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर तो त्यांना मशीदजवळील काकडे बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या ओट्यावर घेऊन गेला. तेथे आणखी दोघे जण होते.
त्यांनी महिलेला, “तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवा,” असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी बांगड्या पिशवीत ठेवल्या. त्यावेळी त्यांनी, “तुम्ही इथे थांबा, आम्ही मालकाकडून पैसे घेऊन येतो,” असे सांगून ते तिघे तेथून निघून गेले.
त्यानंतर महिलेने पिशवीत ठेवलेल्या बांगड्या पाहिल्या असता त्या दिसल्या नाहीत. २४ ग्रॅम वजनाच्या बांगड्या चोरट्यांनी हातचलाखीने लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांनी गोविंद हलवाई चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे तपास करीत आहेत.
भामट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य – चार दिवसांपूर्वी धनकवडी परिसरात बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर मुकुंदनगर तसेच रविवार पेठेतही ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करून त्यांच्याकडील दागिने लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. धान्य आणि कपडे वाटप करण्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे. बतावणी करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
