आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्यापाऱ्यांना त्रास देणे नव्हे, नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हेच अन्न प्रशासनाचे उद्दिष्ट : तुकाराम मुंढे

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 2, 2026
Spread the love

पुणे : अन्न व औषध प्रशासनाचा उद्देश व्यापारी आणि उद्योजकांना त्रास देणे नसून, नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे हा आहे. मात्र, अन्नपदार्थ तयार करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने आयोजित रास्त दरात लाडू-चिवडा उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (दि. १ नोव्हेंबर) गंगाधामजवळील मार्केट यार्ड परिसरातील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नागुश्री सभागृहात झाले.

यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

उपक्रमाच्या उत्पादन प्रक्रियेबाबत अन्न प्रशासनाने केलेल्या सूचनांची चेंबरने अंमलबजावणी केल्याबद्दल मुंढे यांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमांतर्गत सुमारे दोन हजार फूड हँडलर्सना प्रशिक्षण देण्यात आले असून, उत्पादन प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तांत्रिक पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंढे म्हणाले, “सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रास्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा चेंबरचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

अन्न उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांनी कच्चा माल, त्याचे प्रमाण, उत्पादन प्रक्रिया, स्वच्छता, पॅकेजिंग, घटकांची माहिती, उत्पादन तारीख आणि अंतिम वापराची तारीख यांची नोंद ठेवली पाहिजे.

भविष्यात तक्रार उद्भवल्यास उत्पादनाचा मागोवा घेता आला पाहिजे. निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी वेगवेगळे गुणवत्ता निकष न ठेवता प्रत्येक ग्राहकाला समान दर्जाचे आणि सुरक्षित अन्न मिळाले पाहिजे.”

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गेल्या ३८ वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या चेंबरचे कौतुक केले आणि उपक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, “यंदा अन्न प्रशासनाच्या नवीन नियमांची माहिती तुकाराम मुंढे आणि अधिकाऱ्यांकडून घेऊन त्यांची पूर्तता केली आहे.

मुंढे यांनी लाडू फोडून त्याची गुणवत्ता तपासली. तसेच चिवड्यासाठी वापरण्यात येणारे जिन्नस आणि पॅकिंगवरील माहितीची पाहणी केली. त्यांनी समाधान व्यक्त केल्याने चेंबरच्या गुणवत्तापूर्ण कामाला मान्यता मिळाली आहे.”

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना अबनावे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपक्रमाचे ३८ वर्षांपासूनचे साक्षीदार व मार्गदर्शक विठ्ठलशेठ मणियार, जितो इंटरनॅशनलच्या पुणे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोज छाजेड, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, निकिता बाठिया, सिद्धार्थ हॉस्पिटलचे डॉ. विजय सेटिया, पप्पू महाराज, ताराचंद गौड, हेमंत गौड, फूड कन्सल्टंट सोनाली पवार आणि नागुश्री सभागृहाचे अचल जैन यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी हमाल पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

स्वागत सचिव ईश्वर नहार यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले. आभार सहसचिव आशिष दुगड यांनी मानले, तर सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले.