आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यासह इंदापूर, बारामतीत जोरदार पाऊस

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 2, 2026
Spread the love

पुणे : पुणे शहरात रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूरमध्ये मध्यरात्री अतिवृष्टी झाली असून, केवळ ३ तासांत १३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बारामतीमध्ये ७७ मिमी, तर शिवाजीनगर येथे ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २ दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. इंदापूर येथे मध्यरात्री सव्वाबारा ते पहाटे ३ वाजेपर्यंतच्या सुमारे ३ तासांच्या कालावधीत दर १५ मिनिटांनी २० मिमी पाऊस पडत होता.

नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी ऑक्टोबर हिटचा तडाखा पुणेकरांना सहन करावा लागत होता. पुणे शहरात रविवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.

मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यामुळे वातावरणातील गारवा वाढल्याने पुणेकर सुखावले. सोमवारी सकाळीही पावसाचा जोर कायम असून, अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळताना दिसत आहेत.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पाऊस न पडल्याने पुणेकरांनी आपले रेनकोट आणि छत्र्या अडगळीत टाकून दिल्या होत्या. सोमवारी सकाळीच कामावर जायचे असल्याने अडगळीत पडलेले हे रेनकोट आणि छत्र्या पुन्हा बाहेर काढण्यात आल्या.

या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याची तळी साचली आहेत. त्यामुळे सकाळीच कामावर जाणाऱ्या नागरिकांना ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.