युवा पिढीतील उद्यमशीलतेमधूनच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल
सुनील फुलारी यांचे प्रतिपादन : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘कारोबार ९.० – सूर्यभारत जननेक्स्ट स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे :”पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठायचे असेल, तर इनोव्हेशन, स्टार्टअप आणि उद्योग वाढायला हवेत. युवा पिढीने रोजगारर्निमिती आणि उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे. त्यातूनच २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. ‘कारोबार ९.०’सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे मिळत आहेत,” असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता, आत्मविश्वास व रोजगारनिर्मितीची मानसिकता विकसित करण्यावर ‘सूर्यदत्त’ संस्थेचा नेहमीच भर राहिलेला आहे, असे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन, व्यावसायिक कौशल्ये, व्यवस्थापन क्षमता आणि बाजारपेठेची समज विकसित करण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एसआयबीएमटी) यांच्या वतीने आयोजित ‘कारोबार ९.० – सूर्यभारत जननेक्स्ट स्टार्टअप फेस्ट’मध्ये प्रमुख पाहुणे सुनील फुलारी बोलत होते.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपसंचालक हृषीकेश धांडे, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल आदी उपस्थित होते.
प्रसंगी फुलारी यांना पोलीस सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’चा स्कार्फ, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक, पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
तत्पूर्वी, या कार्यक्रमाचे उद्घाटन आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते झाले. प्रसंगी डॉ. अभिजित शाह, डॉ. पूनम वठारकर, डॉ. मिहिका कुलकर्णी, डॉ. कमलाकर मुंडे आणि उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, उद्योजकीय दृष्टिकोनाचे आणि नव्या संधी शोधण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या आंतरमहाविद्यालयीन व्यावसायिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भारतातील युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांचे व्यवसाय मॉडेल्स, नवकल्पना, विपणन धोरणे, गुंतवणुकीचा प्रवास आणि विकासगाथा सादर केल्या.
सुनील फुलारी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या सर्व स्टार्टअप्सचे सादरीकरण केले. प्रत्येक उद्योगाविषयीची सखोल माहिती त्यांना होती.
अशा उपक्रमांमधूनच उद्याचा भारत घडवणारे उद्योजक, नागरिक तयार होतील. ‘सूर्यदत्त’मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला, उद्योजकतेला नेहमीच प्राधान्य दिले जात असल्याचे यातून दिसून येते.
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, उद्यमशीलतेला वाव मिळेल. भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. माझ्या कार्याचा गौरव करीत सूर्यदत्त संस्थेने दिलेला
पुरस्कार मला येत्या काळात आणखी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.” हृषीकेश धांडे यांनी सांगितले की, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष व्यावसायिक जगाचा अनुभव देणारा ठरला आहे.
‘लर्न टुडे लीड टुमॉरो’ या संकल्पनेवर काम करीत विद्यार्थ्यांनी उद्योग ते विकसित भारताचा प्रवास जाणून घेतला. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी शोधणारे नव्हे, तर भविष्यात रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक आणि सक्षम व्यवस्थापक म्हणून घडविण्याच्या सूर्यदत्त संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
‘कारोबर ९.०’ सारखे उपक्रम यामध्ये प्रोत्साहन देणारे ठरतील व भविष्यातील उद्योजक घडविण्यासाठी उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या प्रेरणेतून प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांच्या नेतृत्वात डॉ. विवेक स्वामी, डॉ. हर्षद भडंगे, डॉ. दीपाली देसाई, डॉ. सुनेत्रा गायतोंडे, डॉ. प्रल्हाद जोशी, डॉ. शीतल भुसारे, डॉ. ज्योती गायकवाड, डॉ. आनंद गायकवाड, प्रा. नीलम तोतलानी, प्रा. अंजली मुळीक, डॉ. रसिका दिघे, डॉ. प्रिया बऱ्हाटे, प्रा. प्रियांका वानखेडे यांनी विद्यार्थी गटांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी आभार मानले.
युनिकॉर्न कंपन्यांच्या यशस्वी वाटचालीचा अभ्यास करताना स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक असलेले नियोजन, भांडवल उभारणी, बाजारपेठेची निवड आणि व्यवसायविस्तार यांविषयी विद्यार्थ्यांनी समजून घेतले.
नव्या व्यावसायिक संकल्पना प्रत्यक्षात आणताना येणारी आव्हाने आणि उपलब्ध संधी यांचीही ओळख त्यांना झाली. ‘विकसित भारत @ २०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत असलेला हा महोत्सव युवकांमध्ये उद्योजकता, नवोन्मेष, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची मानसिकता विकसित करण्यास प्रोत्साहन देणारा ठरला.
या उपक्रमांतर्गत एमबीएच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, वित्तीय सेवा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्राहकाभिमुख सेवा अशा विविध क्षेत्रांतील सुमारे ४० हून अधिक लोकप्रिय व्यावसायिक ब्रँड्सचे सादरीकरण केले.
मेक माय ट्रिप, झोमॅटो, इंडिया मार्ट, स्कायरूट एरोस्पेस, इलास्टिकरन, फर्स्टक्राय, कार्स २४, पोर्टर, रिबेल फूड्स, ओला, पेटीएम, पॉलिसीबाझार, एथर एनर्जी, झेप्टो, रॅपिडो, मीशो, नायका, बोट, वनएमजी, फोनपे, बिगबास्केट, ब्लिंकिट, ओयो, फिजिक्सवाला, क्रेड, झोहो, भारतपे आणि झेरोधा यांसह अनेक ब्रँड्सचा समावेश होता.
“आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, संशोधनवृत्ती, निर्णयक्षमता आणि व्यावसायिक संधी ओळखण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. यशस्वी स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेल्सचा अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना एका कल्पनेपासून व्यवसायाची उभारणी, गुंतवणूक, विकास आणि विस्तारापर्यंतचा प्रवास समजतो. अशा अनुभवाधिष्ठित उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय विचारसरणी, आत्मविश्वास आणि रोजगारनिर्मितीची मानसिकता विकसित होण्यास मदत होते.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
‘कारोबार ९.०’च्या पुढील टप्प्यात सूर्यभारत इंडस्ट्रियल रिसर्च ज्ञानपीठ (एसबीआयआरडी) यांच्या माध्यमातून सूर्यदत्त संस्था समूहातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि नवोन्मेष विकासाचे स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याचा प्रस्ताव आहे. या उपक्रमांतर्गत निवडक विद्यार्थी आणि नवउद्योजकांना उद्योग क्षेत्रातील अनुभवी नेते, यशस्वी उद्योजक, संशोधक आणि विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पक संकल्पनांना विकसित करून त्यांचे व्यवहार्य व्यावसायिक उपक्रमांमध्ये रूपांतर करण्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. – सुषमा चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

