पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न
पोलीस अंमलदाराला अटक : मुख्य गेटला दिली कारने जोरात धडक, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत भरधाव कार घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न एका पोलीस अंमलदाराने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पोलीस अंमलदाराने सुरक्षारक्षकांच्या अंगावर कार घालून मुख्य गेटला धडक दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अमोल वसंतराव भिसे (वय ४२) असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून, तो सध्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहे. ही घटना कोरेगाव पार्क परिसरातील पोलीस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यात मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भिसे याच्या पत्नीने २०२५ मध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर २०२६ मध्ये त्याचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि पोलीस मुख्यालयात नेमणूक देण्यात आली होती.
अमोल भिसे हा आपल्या नेमणुकीबाबत अस्वस्थ होता. त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. त्याने काल सायंकाळी दारू प्यायली. त्यानंतर तो आपली कार घेऊन कोरेगाव पार्क येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्याजवळ आला.
बंगल्याच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी त्याला आत जाण्यापासून अडवले. तेव्हा त्याने या सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केली. त्यानंतर तो कार वेगाने घेऊन आला आणि त्याने गेटला कारने धडक दिली.
कार वेगाने येत असल्याचे पाहून सुरक्षारक्षक बाजूला पळाले. कारच्या धडकेने गेटचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अमोल भिसे याला ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकांच्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अमोल भिसे याला अटक केली आहे.
