आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उद्योजक अरविंद झांबरे पतीपत्नीला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 4, 2026
Spread the love

पुणे : हुंडा, पैसे व सोन्यासाठी सासरी छळ झाल्याने पायल झांबरे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सासू व सासरे यांना बुधवारी सकाळी अटक केली आहे. तिचा पती अक्षय अरविंद झांबरे याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

मंगल अरविंद झांबरे (वय ५८) आणि अरविंद झांबरे (वय ६८, रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अक्षय झांबरे याला न्यायालयात हजर करण्यात आले.

आरोपीने केलेला हा गुन्हा महिला अत्याचार व हुंडाबळी अशा गंभीर अपराधांमध्ये मोडतो. पायल घरातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी तिचा शोध घेतला का, वेळोवेळी मागितलेले पैसे, दागिने व मौल्यवान वस्तूंचा आरोपींनी कसा वापर केला, घटनेच्या दिवशी झालेल्या वादाबाबत शेजारी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब घ्यायचे आहेत.

पैसे आणता येत नसतील तर मुलीसह आत्महत्या कर, असे बोलून तिला प्रवृत्त केल्याबाबत तपास करण्यासाठी व गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पायल हिचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून पायल झांबरे हिने २ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या घटनेनंतर अरविंद झांबरे आणि मंगल झांबरे हे पोलिसांपासून वाचण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. हॉस्पिटलमधून आज सकाळी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व रीतसर अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले.