दारूच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की
खराडीतील टेक्सास टॉवरसमोरील घटना : पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांशी झटापट करून पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, अंमलदाराच्या गणवेशाचे बटण तोडून त्यांना जखमी करण्यात आले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार अशोक केदार यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय जयकुमार सावंत (वय ३५) आणि किसन सूर्यभान झेंडे (वय ३२, दोघे रा. बायफ रस्ता, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खराडीतील टेक्सास टॉवरसमोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी टेक्सास टॉवर सोसायटीसमोर सावंत आणि झेंडे हे नशेत गोंधळ घालत होते. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी त्यांना गोंधळ घालू नका आणि येथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, दोघांनी पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे आणि अंमलदार केदार यांच्याशी अरेरावी करून उद्धट वर्तन केले. तसेच, त्यांच्याशी झटापट केली. अशोक केदार यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गणवेशाचे बटण तोडले व त्यांना जखमी केले.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सातपुते तपास करीत आहेत.
