आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अरुंधती भट्टाचार्य यांचा अनुभव ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 25, 2026
Spread the love

पुणे ; सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी सेल्सफोर्सच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अरुंधती भट्टाचार्य यांची विशेष सदिच्छा भेट घेतली. इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (आयएमसी) यांच्या १२० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित सोहळ्यात ही भेट झाली. यावेळी प्रा. डॉ. चोरडिया यांच्या हस्ते भट्टाचार्य यांचा सूर्यदत्तच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी आयएमसीचे अध्यक्ष प्रा. महेंद्र कुमार चौहान आणि महासंचालक अजित मंगरुळकर यांच्याशीही संवाद साधला.

भारतीय व्यापार, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राच्या विकासात आयएमसीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या वर्धापनदिन सोहळ्यात भारतीय उद्योगविश्वाचे भविष्य, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि भविष्यासाठी सज्ज व्यवसायव्यवस्था या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांनी ‘विकसित भारतासाठी उद्योगांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारताकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठी क्षमता असून, या तंत्रज्ञान क्रांतीत केवळ सहभागी न होता भारताने नेतृत्व करण्याची आणि तिला नवी दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी अरुंधती भट्टाचार्य यांना सूर्यदत्तच्या कॅम्पसला भेट देऊन विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद देत सूर्यदत्तमध्ये येण्याची तयारी दर्शवली.

भट्टाचार्य यांचा अनुभव आणि मार्गदर्शन सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत प्रा. डॉ. चोरडिया यांनी व्यक्त केले. त्यांच्या संभाव्य भेटीमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये अरुंधती भट्टाचार्य भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा असताना ईशा फाउंडेशनच्या ‘ईशा इनसाइट्स’ कार्यक्रमातही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची त्यांच्याशी भेट झाली होती. शिक्षणसंस्था, उद्योगविश्व आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या माध्यमातून भविष्यासाठी सक्षम भारत घडविण्याचा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.