आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मार्केट यार्डातील व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 25, 2026
Spread the love

पुणे : चांगल्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणुकीसाठी दिलेले ६० ते ७० लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरून टोळक्याने मार्केट यार्ड येथील एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत शुभम बसवराज म्हेत्रे (वय २३, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात शुभम म्हेत्रे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी मितेश फुलपगार (वय ५०, रा. लोकमान्यनगर) यांना अटक केली आहे. तर हर्षल मितेश फुलपगार (वय २५, रा. लोकमान्यनगर) आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एस. एम. जोशी पुलाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम म्हेत्रे यांचा मार्केट यार्ड येथे प्लॅस्टिकच्या गोण्यांच्या घाऊक विक्रीचा व्यवसाय आहे.

त्यांनी ओळखीचे हर्षल फुलपगार आणि त्याचे वडील मितेश फुलपगार यांच्याकडे जून २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत चांगला परतावा मिळण्याच्या अपेक्षेने ६० ते ७० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

मात्र, सप्टेंबर २०२६ नंतर पैशांची आवश्यकता भासल्याने त्यांनी गुंतवणुकीची रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, दोघेही पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

२२ नोव्हेंबर रोजी त्यांचे फुलपगार यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यावेळी मितेश फुलपगार यांनी त्यांना सायंकाळी एस. एम. जोशी पुलाजवळ बोलावले.

तेथे त्यांना अर्धी फाटलेली दहा रुपयांची नोट देऊन दुसऱ्या दिवशी पुढील व्यवहाराबाबत चर्चा करू, असे सांगितले. त्यानुसार, २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शुभम म्हेत्रे एस. एम. जोशी पुलाजवळ गेले.

त्यावेळी मितेश फुलपगार यांनी व्यवहारासंदर्भात पन्नास रुपयांची फाटलेली नोट घेऊन एक मुलगा येईल, असे सांगितले होते. त्यानुसार तेथे उभ्या असलेल्या व्हॅनजवळ म्हेत्रे गेले.

एका मुलाने त्यांना फाटलेली पन्नास रुपयांची नोट दिली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर आणखी तिघांनी त्यांच्या डोक्यावर आणि हातावर सपासप वार केले.

हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी म्हेत्रे यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौघांनी त्यांचा पाठलाग करत ‘याला जिवंत सोडायचे नाही,’ असे म्हणत त्यांच्यावर पुन्हा वार केले.

परिसरात गर्दी वाढू लागल्याने हल्लेखोर तेथून पळून गेले. एका दुचाकीस्वाराने जखमी म्हेत्रे यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये हलवले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदर्श भांडारे करीत आहेत.