आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

काठीने मारहाण केल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 24, 2026
Spread the love

पुणे : पत्नीला कुत्रा चावल्याच्या रागातून झोपलेल्या श्वानाला काठीने मारहाण केल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. भटक्या श्वानाला मारहाण करून त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शुभम बालाजी पोटेवाड (वय २४, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवा सुभाष कोबळकर (वय ४०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर येथील कृष्णानगरमधील हिंदवी स्वराज्य मित्र मंडळासमोरील रस्त्यावर २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कुत्रा गेल्या १२ वर्षांपासून या परिसरात राहत होता. शिवा कोबळकर यांच्या पत्नीला या श्वानाने चावा घेतला होता. त्याचा राग शिवा याच्या मनात होता. हा श्वान दुपारी झोपला असताना शिवा कोबळकर याने हातातील काठीने त्याला अतिशय क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीत श्वानाचा मृत्यू झाला.

आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यातील कलम ११ (१) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत.