शिवाजीनगर न्यायालयासमोर गोळीबार; तरुणाचा कोयत्याने हात तोडला
टोळीयुद्धातून हल्ला झाल्याची शक्यता : भरदुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर न्यायालयासमोर चौघांनी एका तरुणावर दोन पिस्तुलांतून गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा हात तुटला आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चार ते पाच जणांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे.
शिवाजीनगर न्यायालयाचे कामकाज सुरू असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. त्यावेळी फॅमिली कोर्ट आणि मेट्रो स्टेशनजवळ गोळीबाराचा आवाज आला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच पळापळ सुरू झाली. हल्लेखोरांनी एका तरुणाच्या दिशेने गोळ्या झाडल्या; मात्र त्यांचा नेम चुकला. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील कोयते काढले.
पळून जाणाऱ्या तरुणाला हल्लेखोरांनी फुटपाथवर गाठले आणि त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणाचा हात तुटला. रक्ताच्या थारोळ्यात तरुण पडल्याचे पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून शांतपणे पसार झाले.
घटनास्थळी हल्लेखोरांचे पिस्तूल, कानटोपी आणि चपला पडलेल्या आढळल्या. जखमी तरुणाला रिक्षातून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपीवर हल्ला
शिवाजीनगर न्यायालयासमोर कोयत्याने वार करण्यात आलेल्या तरुणाचे नाव मंदार मारुती किवळे (वय ३६) असे आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कात्रज परिसरात २० एप्रिल २०२५ रोजी जमिनीच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण (वय २८) याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी मंदार किवळे याच्यासह चौघांना सोलापूर येथून अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. न्यायालयातील तारखेला हजर राहण्यासाठी तो आला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात चार ते पाच आरोपी सहभागी असून, हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली.
