दारू पिण्यास विरोध केल्याने तरुणांवर चाकूने हल्ला
हनुमान टेकडीवरील पॅगोडा येथील घटना : दोन घटनांमध्ये तिघांना मारहाण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास विरोध केल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटना हनुमान टेकडी आणि स्वारगेट परिसरात घडल्या.
हनुमान टेकडी परिसरात दारू पिणाऱ्या दोघांना हटकल्याने त्यांच्यापैकी एकाने चाकूने हल्ला करून दोघांना जखमी केले. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केल्याची ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
याबाबत साहिल संदिप सुपेकर (वय २५, रा. पीएमसी कॉलनी, पांडवनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल सुपेकर, त्यांचा मित्र कार्तिक खंडू जाधव (रा. बोपखेल) आणि सतीश सुनील घोडे (रा. पीएमसी कॉलनी) हे तिघे हनुमान टेकडी येथील पॅगोडा परिसरात सायंकाळी फिरायला गेले होते.
त्यावेळी पॅगोडाजवळ दोघे जण दारू पित बसले होते. त्यांच्यापैकी एकाने त्यांच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली. त्यांनी आमच्याकडे माचिस नाही, तसेच येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नका, असे सांगितले.
त्याचा राग आल्याने त्याने बॅगेतील चाकू काढून सतीश याच्या पोटाच्या बाजूला आणि कार्तिक याच्या मांडीवर वार केले. तसेच बॅगेत असलेली स्टिक सतीशच्या डोक्यात मारून दोघांना जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
विरोध केल्याने तरुणाच्या डोक्यात घातला दगड – दुसरी घटना स्वारगेट येथील पुरंदर कॉम्प्लेक्स येथे २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत नवल किशोर बोधीलाल सिंग (वय ३०, रा. सुपर ड्रायक्लीनर्स, पुरंदर कॉम्प्लेक्ससमोर, स्वारगेट) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी साहिल मनोज चव्हाण (वय २६, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) याच्यासह मनोज नावाच्या त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रस्त्यावर दारू पित होते. फिर्यादी यांनी आरोपींना येथे दारू पिण्यास मनाई असून, येथे दारू पिण्यास बसू नका, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून दोघांनी किशोर सिंग यांना हाताने मारहाण केली. शिवीगाळ करून कुंडी फोडली आणि तिचे तुकडे किशोर यांना मारले. मनोज याने दगड उचलून किशोर यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
