हॉटेल रुपाली, वैशालीवर एफडीएची कारवाई
स्वच्छतागृहाशेजारी डोसा तयार करण्याचा तवा; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध रुपाली आणि वैशाली या दोन्ही हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केले आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी दूर करण्यात आल्या नसल्याने एफडीएने ही कारवाई केली आहे.
तपासणीदरम्यान हॉटेल वैशालीला ९८ पैकी ५८ गुण मिळाले. काही अन्नपदार्थ उघड्यावर ठेवण्यात आले होते. तसेच, डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा स्वच्छतागृहाशेजारी असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. हॉटेल रुपालीमध्येही अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नव्हते. काही पदार्थांवर वापरण्याची अंतिम तारीख नमूद करण्यात आली नव्हती.
दोन्ही हॉटेलना आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करावी लागणार आहे. एफडीएकडून पुनर्तपासणी करून लेखी परवानगी मिळेपर्यंत या हॉटेलना अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी करता येणार नाही.
फर्ग्युसन रोडवरील ही दोन्ही हॉटेल पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. सकाळी टेकडीवर फिरायला गेल्यानंतर रुपालीमध्ये नाश्ता करणे, चहा घेणे किंवा मित्रांसोबत गप्पांची मैफल जमविणे, हा अनेकांचा नित्यक्रम आहे. तर ज्यांची स्वतःची कार्यालये नाहीत, अशा छोट्या व्यावसायिकांसह अनेकांसाठी व्यावसायिक चर्चा करण्याचे ठिकाण म्हणून हॉटेल वैशाली लोकप्रिय आहे. त्यामुळे एफडीएच्या या कारवाईमुळे दोन्ही हॉटेलना व्यवसाय बंद ठेवावा लागणार असून, त्यांच्या नियमित ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे.
