आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

९० लाखांचे पार्सल चोरणाऱ्या कामगारासह चौघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 14, 2026
Spread the love

पुणे : पुण्याहून मुंबईला सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असे ९० लाख ३३ हजार रुपयांचे कुरिअर पार्सल घेऊन जाणारा कामगार वाटेतच उतरून पसार झाला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी खडक पोलिसांच्या पथकाने गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन वेळा उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला. गेल्या २५ दिवसांत १० हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करून या कामगारासह चौघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विशाल सत्यपालसिंग चौहान (वय २०), विकासकुमार रामबीरसिंग जाधोन (वय २६), बिनेश सत्यपालसिंग चौहान (वय २७, तिघे रा. एटा, उत्तर प्रदेश) आणि बृजेश सुरेंदसिंग चौहान (वय १८, रा. कासगंज, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी जितेंद्र ऋषिकेश सिंह (वय ३३, रा. घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा एसजीएलजेपी लॉजिस्टिक या नावाने कुरिअरचा व्यवसाय आहे. ग्राहकांचे सोने आणि रोकड कुरिअरद्वारे पाठविण्याचे काम ते करतात. त्यांच्याकडे विशाल चौहान कामाला होता.

५ ऑगस्ट रोजी पहाटे सिंह यांनी विशाल चौहान याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असे ९० लाख ३३ हजार रुपयांचे पार्सल मुंबईतील कार्यालयात पोहोचविण्यासाठी दिले होते. विशाल हा एसटी बसने मुंबईला जात असताना वाटेत वाकड पुलाजवळ उतरला आणि तेथून पसार झाला. त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तो उत्तर प्रदेशातील आपल्या गावी नातेवाइकांच्या घरी लपून बसल्याचे समोर आले.

तपासादरम्यान विशालचा भाऊ बिनेश चौहान, मित्र विकासकुमार जाधोन, राधेश्याम ऊर्फ पिंकू चौहान आणि बृजेश चौहान यांनी या गुन्ह्यात कट रचल्याचे निष्पन्न झाले.

सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाडे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, हेमंत पेरणे, मयूर भोसले, सैफ नदाफ, निलेश साबळे आणि विकास पांडुळे यांच्या पथकाने २५ दिवस अहोरात्र तपास केला. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेश, नोएडा आणि उत्तराखंडमधील डेहराडून परिसरात आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपी उत्तर प्रदेशातील एटा, कासगंज आणि गौतम बुद्धनगर जिल्ह्यांत लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने तीन वेळा उत्तर प्रदेशात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार आणि समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाडे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे तसेच पोलीस अंमलदार विनोद शिंदे, मयूर भोसले, हेमंत पेरणे, अमित जमदांडे, निलेश साबळे, विकास पांडुळे, सैफ नदाफ, उमेश मठपती, संतोष साबळे आणि सागर कुडले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

२६ लाखांचा ऐवज जप्त

आरोपींकडे केलेल्या चौकशीत विकासकुमार जाधोन याच्या घरातून १६ लाख ८० हजार रुपये किमतीची, १२० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे जप्त करण्यात आली. तसेच, गुन्ह्यात मदत करणारा त्याचा मेहुणा बृजेश चौहान याला अटक करून त्याच्या घरातून सात लाख रुपये रोख, एक सोन्याची अंगठी आणि चांदीची साखळी जप्त करण्यात आली. या सर्व ऐवजाची एकूण किंमत २६ लाख ३३ हजार रुपये आहे.