आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खुनाच्या खटल्यातून पोलीस हेड कॉन्स्टेबल दोषमुक्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 14, 2026
Spread the love

पुणे : जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणात कट रचणे आणि आर्थिक मदत केल्याचा आरोप असलेल्या पुणे शहर पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल विक्रम गणपत फडतरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. आरोपांच्या समर्थनार्थ ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी या प्रकरणाची सुनावणी करून निर्णय दिला.

बारामती तालुक्यातील जुनी सांगवी येथील पणदरे रोड परिसरातील शेतात १२ एप्रिल २०२३ रोजी विनोद हिराचंद फडतरे (वय ३६) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी विशाल गणपत फडतरे, गणपत कृष्णा फडतरे आणि विक्रम गणपत फडतरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गणपत फडतरे आणि विक्रम फडतरे यांनी फूस लावल्यामुळे विनोद यांचा चुलत भाऊ विशाल फडतरे याने खून केला होता. या प्रकरणात विक्रम फडतरे यांच्यावर खुनाचा कट रचणे आणि खुनासाठी आर्थिक मदत केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. विक्रम फडतरे हे पुणे शहर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

या प्रकरणात आपल्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, यासाठी विक्रम फडतरे यांनी बारामती सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. या अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्यासमोर सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान अर्जदाराविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करण्यात आला. खुनाचा कट रचल्याचे किंवा त्यासाठी आर्थिक मदत केल्याचे दर्शवणारा कोणताही ठोस आर्थिक व्यवहाराचा पुरावा उपलब्ध नव्हता. तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) किंवा अन्य आरोपींशी संपर्क असल्याचे पुरावेही तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आले नव्हते. केवळ साक्षीदाराच्या विधानाच्या आधारे अर्जदाराला या प्रकरणात आरोपी करण्यात आल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर आला.

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे दर्शवणारे पुरावे महत्त्वाचे असतात. मात्र, विक्रम फडतरे यांच्याविरुद्ध कटातील सहभाग किंवा आर्थिक मदतीचे आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावे नसल्याचे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने त्यांना खुनाच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे बारामती सत्र न्यायालयात फेटाळण्यात आलेल्या त्यांच्या अर्जाला उच्च न्यायालयात यश मिळाले आणि त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला.

अ‍ॅड. धनराज लोढा यांचा प्रभावी युक्तिवाद

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धनराज ए. लोढा यांनी विक्रम फडतरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात सखोल आणि कायदेशीरदृष्ट्या अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. केवळ ऐकीव माहिती अथवा कौटुंबिक वैमनस्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला गंभीर गुन्ह्यात गोवणे योग्य नाही, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कट रचणे आणि आर्थिक मदत केल्याचे आरोप सिद्ध करणारा कोणताही ठोस आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) किंवा अन्य आरोपींशी संपर्काचा पुरावा तपास यंत्रणेकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठोस पुराव्यांअभावी खटला सुरू ठेवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग ठरू शकतो, असा प्रभावी युक्तिवाद त्यांनी केला.