तरुणाच्या छातीत चाकूने वार करून खून
बालेवाडीतील घटना : पाणी भरण्यावरून झाला होता वाद, बाणेर पोलिसांनी वेटरला केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नळावर पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून वेटरने चाकूने वार करून तरुणाला गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना या तरुणाचा मृत्यू झाला. बाणेर पोलिसांनी वेटरला अटक केली आहे.
करण राजू करपे (वय १९, रा. बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी प्रतीक संतोष मानकर (वय २१, रा. परफेक्ट सोसायटीसमोर, बालेवाडी) याला अटक केली आहे.
याबाबत केरबा शिंदे (वय ४७, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता बालेवाडी येथील परफेक्ट सोसायटीसमोर, राजू बालवडकर यांच्या चाळीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक मानकर हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. राजू बालवडकर यांच्या चाळीत पाणी भरण्यावरून करण आणि प्रतीक यांच्यात भांडण झाले.
फिर्यादी हे प्रतीकला समजावून सांगत असताना तो घरात गेला. तेथून कांदा कापण्याचा चाकू घेऊन आला. त्याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली.
तसेच करणच्या छातीत चाकूने वार केला. त्यात करण गंभीर जखमी झाला. त्याला सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
बाणेर पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून प्रतीक मानकर याला अटक केली होती. या गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.
