आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएसआयला लाच घेताना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 17, 2026
Spread the love

पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात यापूर्वी १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेतली असताना, आणखी २० हजार रुपये घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे.

नाथा रामकिसन केकाण (वय ३८, रा. साई व्हिजन सोसायटी, रावेत) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या भावावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी आणि जामिनासाठी पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी यापूर्वी १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांच्या भावावरील चाप्टर केसप्रकरणी मदत करण्यासाठी आणि चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १६ नोव्हेंबर रोजी मिळाली. त्यानुसार पडताळणी केली असता, नाथा केकाण याने यापूर्वी लाच स्वीकारल्याचे मान्य केले. तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे त्याने मान्य केले.

त्यानंतर लोणावळा येथील फूड कोर्ट येथे सापळा रचण्यात आला. यावेळी नाथा केकाण याला तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेताना पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार वनिता गोरे, दगडू सोनावणे आणि पोलीस अंमलदार रवी दिवेकर यांनी केली आहे.