आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तोतया आयएएस अधिकाऱ्याने केली ३५ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 17, 2026
Spread the love

पुणे : आपण आयएएस झालो असल्याची बतावणी करून बिल्डरकडून सोसायटी नावावर करून घेत लोकांचा विश्वास संपादन केला. सोसायटीचा चेअरमन बनल्यानंतर सोसायटीच्या मुदत ठेवी मोडल्या. तसेच सोसायटीतील रिकामे फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाणेर पोलिसांनी या तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे.

हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१, रा. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटी, बालेवाडी) असे या तोतयाचे नाव आहे. याबाबत सोसायटीचे खजिनदार दत्तात्रय वैजनाथ नागरगोजे (वय ३१, रा. ऋतुजा कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना बालेवाडी हाय स्ट्रीट येथील इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटीत जानेवारी २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश कुलकर्णी याने वडिलांना आपण लोकसेवा आयोगामार्फत आयएएस झालो असल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांनी ही बाब इतरांना सांगितली. त्यावरून त्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. न्यूज चॅनेलने त्याची मुलाखत घेतली. स्थानिक क्लबने त्याचे स्वागत करणारे फलक लावले. प्रत्यक्षात तो बारावी पास आहे.

दरम्यान, त्याला म्हाडामार्फत इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट मिळाला. तो येथे राहायला आल्यानंतर त्याने सोसायटीतील सर्वांना आपण आयएएस झालो असून, लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे सांगितले. तसेच वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवल्या. त्याने पुढाकार घेऊन बिल्डरकडून कन्व्हेयन्स डीड करून इमारत सोसायटीच्या नावावर करून दिली. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला.

सोसायटीतील अनेकांनी येथील फ्लॅट भाड्याने देऊन ते दुसरीकडे राहतात. त्या सर्वांनी हितेश कुलकर्णी याला चेअरमन केले. सोसायटीतील अनेकांनी वनटाइम मेंटेनन्स भरला होता. ही सर्व ३७ लाख रुपयांची रक्कम बँकेत मुदत ठेवीमध्ये जमा होती. चेअरमन झाल्यानंतर त्याने या मुदत ठेवींवर १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी ५ लाख रुपये स्वतः वापरले. ३७ लाखांच्या मुदत ठेवींमधून मिळालेले २७ लाख रुपये आणि सोसायटीच्या खात्यातील शिल्लक ३ लाख रुपये, असे एकूण ३० लाख रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.

सोसायटीमधील काही फ्लॅट रिकामे आहेत. विक्री न झालेले हे फ्लॅट लॉटरीद्वारे मिळवून देतो, असे सांगून त्याने लोकांकडून पैसे घेतले. त्यांना चॅटजीपीटीद्वारे तयार केलेली बनावट पत्रे दिली. अशा प्रकारे सर्व सभासदांची एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हितेश कुलकर्णी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.