आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लाचखोर पोलीस हवालदार दीड महिन्यानंतर अटकेत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 17, 2026
Spread the love

पुणे : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी ९५ हजार रुपयांची लाच घेताना सापळा कारवाईची चाहूल लागल्याने पळून गेलेल्या पोलीस हवालदाराला दीड महिन्यानंतर अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.

सतीश नाथराव मुंढे (वय ४५) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शिरूर पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन कारवाया केल्या होत्या. सतीश मुंढे याच्याकडे असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी सतीश मुंढे याने १ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच पडताळणीदरम्यान त्याने ९५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून ९५ हजार रुपये घेतल्यानंतर त्याला सापळा कारवाईचा सुगावा लागला. त्यानंतर तो ९५ हजार रुपये आणि तक्रारदाराकडील कागदपत्रे घेऊन पळून गेला होता.

पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी त्याला १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शिरूर नगर परिषद परिसरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.